IND vs NED | विराट, सूर्यकुमार, गिलला अचानक बॉलिंग का दिली? रोहितने सांगितलं त्या मागच कारण
IND vs NED | टीम इंडियाने काल नेदरलँड्स विरुद्धचा शेवटचा साखळी सामना मोठ्या फरकाने जिंकला. पण त्याचवेळी या मॅचमध्ये टीम इंडियाने काही प्रयोग केले. चक्क विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुभमन गिलने बॉलिंग केली. फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्लेयर्सनी बॉलिंग का केली? त्यामागच कारण रोहितने सांगितलं.
मुंबई : टीम इंडियाने रविवारी नेदरलँड्स विरुद्धचा सामना 160 धावांच्या फरकाने जिंकला. टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. पहिली बॅटिंग करतान टीम इंडियाने 4 बाद 410 धावांचा डोंगर उभारला. नेदरलँड्सची टीम 250 रन्सवर ऑलआऊट झाली. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. वनडे वर्ल्ड कप 2023 मधील टीम इंडियाचा हा शेवटचा साखळी सामना होता. टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियनच्या थाटात खेळत आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील सर्वच्या सर्व 9 सामने जिंकले आहेत. महत्त्वाच म्हणजे एकही सामना अटी-तटीचा न होता आरामात टीम इंडियाने विजय संपादन केलाय. बॅटिंग पेक्षाही बॉलिंगमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केलीय. एकाही प्रतिस्पर्धी संघाला टीम इंडियाच्या गोलंदाजीवर मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी आग ओकणारी गोलंदाजी करतायत. त्यांच्या जोडीला कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजाची फिरकी आहे. या पाच जणांसमोर मोकळेपणाने फलंदाजी करणं कुठल्याही टीमला शक्य झालेलं नाहीय.
टीम इंडिया आज सर्वच आघाड्यांवर सरस वाटत असली, तरी एका चिंता कायम आहे. आज संघाची गोलंदाजी बळकट आहे. पण या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाचच गोलंदाज आहेत. म्हणजे कॅप्टन रोहित शर्माकडे हमखास उपयोगात येईल असा सहावा पर्याय नाहीय. या पाच गोलंदाजांव्यतिरिक्त रोहित शर्माकडे पर्याय नाहीय. काल नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात रोहितने याच समस्येच उत्तर शोधण्याच प्रयत्न केला. कालच्या सामन्यात चक्क विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्माने गोलंदाजी केली. हे प्युर फलंदाज आहेत. त्यांना गोलंदाजी करताना पाहण ही खूप दुर्मिळ बाब आहे. विराट कोहलीने चक्क 3 ओव्हर्समध्ये 13 रन्स देऊन 1 विकेटही घेतली. रोहितने अचानक यांच्या हाती चेंडू कसा काय सोपवला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गिल, सूर्यकुमारला का बॉलिंग दिली? रोहित शर्माने काय सांगितलं?
सामना जिंकल्यानंतर बोलताना रोहित शर्माने हा गेम प्लानचा भाग असल्याच सांगितलं. “प्रयोगाचा हा एक भाग होता. आज आमच्याकडे गोलंदाजीत 9 पर्याय होते. या सामन्यात आम्ही काही प्रयोग करु शकत होतो, हे महत्त्वाच आहे. वेगवान गोलंदाज वाईड यॉर्कर टाकत होते. खरंतर त्याची गरज नव्हती, पण आम्हाला ते करायचं होतं. बॉलिंगमध्ये आम्हाला काही वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आम्ही काय साध्य केलं ते तुमच्यासमोर आहे” असं रोहित शर्मा म्हणाला. न्यूझीलंड विरुद्ध 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेमीफायनलचा सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला सहाव्या गोलंदाजाच्या पर्यायाची चाचपणी करायची होती.