WI vs IRE: मोठी बातमी – वेस्ट इंडिजची टीम टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर
WI vs IRE क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. इथे काहीही होऊ शकतं. असंच ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये घडलय.
होबार्ट: क्रिकेटला (Cricket) अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. इथे काहीही होऊ शकतं. एखादी मोठी टीम इथे हरु शकते, तर कमी लेखला जाणारा संघही विजय मिळवतो. टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) च्या 11 व्या मॅचमध्ये असच घडलं. दोन वेळच्या टी 20 चॅम्पियन वेस्ट इंडिजचं (WI vs IRE) टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलय. होबार्ट येथे हा सामना झाला.
या मॅचमध्ये आयर्लंडने वेस्ट इंडिजच्या टीमचा 9 विकेटने पराभव केला. या पराभवासह वेस्ट इंडिजच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलय. आयर्लंडची टीम सुपर-12 राऊंडमध्ये दाखल झाली आहे.
वेस्ट इंडिजने किती धावा केल्या?
फलंदाज आणि गोलंदाज दोघांच्या सुमार कामगिरीमुळे वेस्ट इंडिजचा पराभव झाला. वेस्ट इंडिजने 20 ओव्हर्समध्ये 146 धावा केल्या. त्यानंतर आयर्लंडच्या फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पॉल स्टर्लिंग, कॅप्टन एंड्रयू बलबिर्नी आणि लॉर्कन टकर यांनी जबरदस्त फलंदाजी करुन टीमला विजय मिळवून दिला.
वेस्ट इंडिजची फ्लॉप बॅटिंग
वेस्ट इंडिजने टॉस जिंकल्यानंतर पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला. काइल मेयर्स फक्त 1 रन्स बनवून आऊट झाला. जॉनथन चार्ल्सने चांगली इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला. एविन लुईस 18 चेंडूत 13 धावा करुन आऊट झाला. चार्ल्सने फक्त 24 रन्स केल्या. कॅप्टन पूरन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याने 11 चेंडूत फक्त 13 रन्स केल्या.
ब्रँडन किंगने नाबाद 62 धावा केल्या. त्यामुळे टीमची धावसंख्या 146 पर्यंत पोहोचली. आयर्लंडचा लेग स्पिनर डेलानीने 4 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
आयर्लंडची जबरदस्त बॅटिंग
147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडने आक्रमक सुरुवात केली. पॉल स्टर्लिंग आणि कॅप्टन बलबिर्नीने पहिल्या विकेटसाठी 45 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. दोघांच्या जोरदार बॅटिंगमुळे वेस्ट इंडिजची टीम मॅच बाहेर गेली.
विकेटकीपर टकरने क्रीजवर येताच जोरदार हिटिंग केली. स्टर्लिंगने फक्त 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला व सुपर-12 राऊंडमध्ये प्रवेश केला.
आयर्लंडची टीम पहिली मॅच हरली होती
आयर्लंडच्या टीमने झिम्बाब्वे विरुद्ध पहिला सामना गमावला होता. मात्र त्यानंतर सलग दोन विजय मिळवून आयर्लंडने सुपर-12 मध्ये प्रवेश केला. वेस्ट इंडिजने स्कॉटलंड विरुद्ध आपला पहिला सामना गमावला होता. त्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवला. पण अखेरच्या सामन्यात आयर्लंडकडून पराभव झाला. त्यामुळे त्यांच टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलय.