WTC Final 2023 | महाअंतिम सामन्याआधी मोठा निर्णय, कुणासाठी ठरणार फायदेशीर?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्याला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या हा निर्णय कुणाच्या फायद्याचा?
मुंबई | आयपीएलनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर कोणत्याही अडचणीमुळे सामन्यादरम्यान काही षटकांचा खेळ वाया जाऊ नये, याचीही खबरदारी आयसीसीने घेतली आहे. त्या अनुषगांने आयसीसीने 12 जून हा दिवस ठेवला आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. हा सामना कोणत्या बॉलने खेळवण्यात येणार याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
टीम इंडिया पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये ड्यूक बॉलशिवाय कसोटी सामना खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महाअंतिम सामना हा ड्यूकऐवजी कुकाबुरा बॉलचा वापर करण्यात येणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2021 चा सामना हा टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात ड्यूक बॉल वापरण्यात आला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने काउंटी टीमकडून ड्यूक बॉलच्या दर्जजाबाबत तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी ड्यूकऐवजी कुकाबुरा बॉल वापरण्याबाबत सहमती दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यानेही याबाबत उल्लेख केला. आयसीसीही ड्यूकऐवजी कुकाबूका बॉल वापरण्याबाबत सहमत असल्याचं पॉन्टिंगने सांगितलंय.
पॉन्टिंग काय म्हणाला?
रिकी पॉन्टिंग याने या सामन्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. हा ऐतिहासिक सामना टीम इंडियाचे सलामी फलंदाज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पेसर यांच्यात असणार आहे. आपण नेहमी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या फिरकीबाबत चर्चा करतो. मात्र या सर्व बाबी द ओव्हलमधील स्थितीनुसार ठरतात, असंही पॉन्टिंगने म्हटलं.
मी या मैदानात खेळलोय. ही खेळपट्टी आधी फलंदाजांसाठी मदतशीर ठरते. त्यानंतर फिरकी गोलंदाजांनाही पिचमधून मदत मिळते, असं पॉन्टिंगने म्हटलं. त्यामुळे आता कुकाबूरा बॉलने खेळण्याचा निर्णय कुणाच्या पथ्याावर पडणार, हे लवकरच समजेल.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.