लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना अत्यंत रंगात आला आहे. आजच्या शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी भारताला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. तर भारताला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियालाही आपली रणनीती बदलावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला आधीच 444 धावांचं लक्ष्य दिलं आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे. भारत अजूनही 280 धावांनी मागे आहे. आजचा कसोटी सामना जिंकणं कठिण असलं तरी भारताला जिंकण्यासाठी अजूनही फिफ्टी फिफ्टी संधी आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
विराट कोहली आणि अजिंक्य राहणे क्रिझवर आहेत. या दोघांनाही आज अखेरच्या दिवशी चमत्कार करावा लागेल. लक्ष्य गाठण्यासाठी मोठी खेळी आणि मोठी भागिदारी करावी लागेल. दोघांनाही मैदानावर नुसतं तग धरून राहावं लागणार नाही तर आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. टीम इंडियाला एक तर आजचा सामना जिंकावा लागेल किंवा हा सामना ड्रॉ कसा होईल या दृष्टीने रणनीती आखावी लागणार आहे. त्यामुळे आज भारत कोणत्या डावपेचांनी मैदानात उतरणार हे पाहावं लागमार आहे.
आजच्या सामन्यात हवामानावरही सर्वांचं लक्ष असणार आहे. द ओव्हलमध्ये हा सामना होत आहे. आज लंडनमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, सामन्याच्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे. लंडनमध्ये रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. आकाशात काळे ढग राहतील. दिवसाही 67 टक्के ढगाळ वातावरण राहील. तर संध्याकाळी 95 टक्के ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळेच रात्री पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावेळी पाऊस पडतो की नाही याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चौथ्या दिवशी भारताने 444 धावांचा पाठलाग करताना जोरदार फलंदाजी केली होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, गिल झेलबाद झाला. स्कॉट बौलंडच्या चेंडूवर कॅमरन ग्रीनने स्लीपला त्याची कॅच पकडली. त्यामुळे गिलला बाद देण्यात आलं. मात्र, या कॅचवरून वाद झाला. चेंडू जमिनीला लागल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं होतं. थर्ड अंपायरने हा वादग्रस्त निर्णय दिल्यानंतर स्टेडियममधून संताप व्यक्त झाला. प्रेक्षकांनी चीटर चीटरच्या घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली.