युजवेंद्र चहलचं Virat Kohli च्या फॉर्मबद्दल महत्त्वाचं विधान, खरी समस्या ही आहे की….
कोहली सध्या करीयरमधल्या खराब फॉर्म मधून जात आहे. मागच्या अडीच वर्षांपासून कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये शतक झळकवू शकलेला नाही.
मुंबई: मागच्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चर्चेमध्ये आहे. आधी व्यक्तीगत जीवन आणि अफवांमुळे तो चर्चेत होता. आता विराट कोहलीबद्दल (Virat kohli) केलेल्या विधानामुळे युजवेंद्र चहल चर्चेत आहे. चहल आणि कोहली बऱ्याच सामन्यांमध्ये एकत्र खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) टीम मध्ये चहल कोहलीसोबत 8 वर्ष होता. यावर्षी राजस्थानने चहलला विकत घेतलं. कोहली सध्या करीयरमधल्या खराब फॉर्म मधून जात आहे. मागच्या अडीच वर्षांपासून कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये शतक झळकवू शकलेला नाही. यजुवेंद्र चहलच्या मते ही फक्त शतकाची बाब नाही, तर या दरम्यान कोहलीने महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
कोहलीची सरासरी 50 पेक्षा जास्त
“कोहली असा व्यक्ती आहे, ज्याची टी 20 मध्ये सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. दोन वर्ल्ड कप मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवलाय. सर्व फॉर्मेट मध्ये मिळून 70 शतकं आहेत. तुम्ही सर्व फॉर्मेट मध्ये त्याची सरासरी बघा. आपण फक्त त्याच्या शतकाबद्दल विचार करतो, ही खरी समस्या आहे. त्याच्या 60-70 धावांच्या योगदानाबद्दल बोलत नाही” असं चहलने सांगितलं.
….तर कोहलीपासून स्वत:ला वाचवण्याचा गोलंदाजांचा प्रयत्न असेल
कोहली क्रीजवर आहे आणि त्याने 15 ते 20 धावा केल्या असतील, तर कुठलाही गोलंदाज त्याला बॉलिंग करण्यासाठी इच्छुक नसेल, असं चहल स्पोर्ट्स यारीशी बोलताना म्हणाला. कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपल्या खेळाबद्दलही चहल व्यक्त झाला. वेगवेगळ्या कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याचा रोल एकच होता. विकेट घेणारा गोलंदाज म्हणून नेहमी ते माझा वापर करतात, असं चहल म्हणाला.
ट्रोलर्सनी आयुष्यात काही केलं नाही
दोन-तीन दिवसांपूर्वी चहलच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. चहल आणि त्याची बायको धनश्रीच्या घटस्फोटाच्या अफवा उडत होत्या. चहलने या सगळ्यामध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं. “सोशल मीडियावर बरच काही सुरु असतं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. 5 फॉलोअर्स असलेले लोक कमेंट करतात. त्यांनी ट्रोल करण्यासाठीच अकाऊंट बनवले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात काही केलं नाही. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे” असं चहल म्हणाला.