IND vs ZIM: ‘आम्हीच जिंकणार वनडे सीरीज’, इनोसेंट कायाचा दावा
भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळण्यासाठी झिम्बाब्वे मध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू नसतानाही भारताची बाजू वरचढ दिसतेय.
मुंबई: भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळण्यासाठी झिम्बाब्वे मध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू नसतानाही भारताची बाजू वरचढ दिसतेय. भारतासमोर तुलनेने कमकुवत असलेल्या झिम्बाब्वेला नमवण्यात कुठलीही अडचण येऊ नये. झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश विरुद्ध मिळालेल्या विजयाने उत्साहीत आहे. अशा स्थितीत झिम्बाब्वेला कमी लेखून चालणार नाही. झिम्बाब्वे संघातील फलंदाज इनोसेंट कायाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. झिम्बाब्वेचा संघ 2-1 ने वनडे सीरीज जिंकेल, अशी भविष्यवाणी कायाने केली आहे.
मला सर्वाधिक धावा आणि शतक ठोकायचं आहे
इनोसेंट काया एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, “ही सीरीज 2-1 ने झिम्बाब्वे जिंकेल. व्यक्तीगत बोलायच झाल्यास, मला सर्वाधिक धावा आणि शतक ठोकायचं आहे. सीरीज मधील यशस्वी फलंदाज बनण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. तेच माझे लक्ष्य असेल”
हीच बाब आमच्या पथ्यावर पडेल
इनोसेंट कायाने यावर्षी डेब्यु केला. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता आहे. हीच बाब आमच्या पथ्यावर पडेल, असा कायाचा दावा आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या सीरीजचा भाग नाहीयत.
मला विश्वास आहे, मी….
“विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा नसतात, त्यावेळी भारतीय क्रिकेटपटू जास्त गांभीर्याने क्रिकेट खेळतात. झिम्बाब्वे दौऱ्यावर येणारा भारतीय संघ मजबूत आहे, हे मला ठाऊक आहे. त्याच्याविरुद्ध खेळणं सोप आहे, असं म्हणून आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. मला विश्वास आहे, मी भारताविरुद्ध चांगला खेळ दाखवीन” असं इनोसेंट काया म्हणाला.
बांगलादेश विरुद्ध शानदार प्रदर्शन
या डावखुऱ्या फलंदाजाने बांगलादेश विरुद्ध 2-1 ने मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कायाने हरारे मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 110 धावांची शतकी खेळी खेळला. त्याने या सामन्यात चौथ्या विकेटसाठी सिकंदर राजासोबत 192 धावांची भागीदारी केली. रजा नाबाद 135 धावा बनवून सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.