Aus vs Zim: दुबळ्या झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दिला ‘जोर का झटका’
झिम्बाब्वेने वनडे (ODI) क्रिकेट मध्ये धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला (Aus vs ZIM) तीन विकेटने हरवलं.
मुंबई: झिम्बाब्वेने वनडे (ODI) क्रिकेट मध्ये धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला (Aus vs ZIM) तीन विकेटने हरवलं. ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 141 धावा केल्या. झिम्बाब्वे (zimbabwe) हे लक्ष्य सात विकेट गमावून पार केलं. झिम्बाब्वेने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवलं आहे. झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. झिम्बाब्वेने 39 ओव्हर मध्ये विजयी लक्ष्य गाठलं. झिम्बाब्वेने कायम लक्षात राहिलं, असा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिलाय.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दोन आकडी धावाही जमल्या नाहीत
ऑस्ट्रेलियाकडून फक्त सलामीवीर डेविड वॉर्नरने धडाकेबाज खेळ दाखवला. त्याने सर्वाधिक 94 धावा केल्या. फक्त दोन फलंदाज वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज दोन आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. ग्लेन मॅक्सवेलने 19 धावा केल्या.
रियान बर्लच्या फिरकी मध्ये फसले
ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखण्यात लेग स्पिनर रियान बर्लने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. या खेळाडूने फक्त तीन ओव्हर मध्ये पाच विकेट घेतल्या. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजीच कंबरड मोडलं. रियानने मॅक्सवेल, एश्टन एगर (०), वॉर्नर आणि मिचेल स्टार्क (2) आणि जोश हेझलवूडला आऊट केलं. त्याशिवाय झिम्बाब्वेच्या ब्रँड इव्हान्सने दोन विकेट काढल्या.
रेगिसची कॅप्टन इनिंग
ऑस्ट्रेलियाची टीम भले कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाली. पण त्यांच्या विजयाची शक्यता जास्त होती. कारण त्यांच्याकडे एकापेक्षाएक सरस गोलंदाज आहेत. यात मिचेल स्टार्क, हेजलवूड, एडम झम्पा, असे दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यांच्यासमोर झिम्बाब्वेची फलंदाजी कमकुवत आहे. झिम्बाब्वेने 115 धावात 6 विकेट गमावल्या होत्या. कॅप्टन रेगिस चाकाब्वाने निराश केलं नाही. त्याने नाबाद 37 धावांची इनिंग खेळून टीमला विजय मिळवून दिला. त्याने 72 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार लगावले.
2014 मध्येही हरवलं होतं
याआधी झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 2014 साली वनडे मध्ये हरवलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिका झाली होती. या मालिकेच्या एका सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. 2014 च्या आधी झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 1983 च्या वर्ल्ड कप मध्ये हरवलं होतं.