रुडकी: भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून घरी जात असताना उत्तराखंडमधील रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला अन् काही क्षणात कार जळून खाक झाली. मात्र, या अपघातातून ऋषभ बालंबाल बचावला आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. या अपघातात ऋषभला प्रचंड मार लागल्याचं सांगितलं जात आहे.
ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती.
त्यामुळे कारला भीषण आग लागली. त्यामुळे बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली.
या अपघातात ऋषभ पंतला मोठा मार लागला आहे. त्याच्या कपाळावर जबर मार लागला आहे. शिवाय ऋषभच्या पाय आणि पाठीलाही भीषण मार लागला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभला दिल्ली रोड येथील सक्षम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
ऋषभची प्रकृती स्थिर असल्याचं सक्षम रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर सुशील नागर यांनी सांगितलं. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक देहात स्वप्न किशोर सिंह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा पंचनामा सुरू केला असून अधिक तपास सुरू आहे.