क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा रुडकी बॉर्डरवरील दिल्ली-देहरादून हायवेवर भीषण अपघात झाला. ऋषभची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर आग लागली. या अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे.
रुडकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर ऋषभला देहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.
अपघातावेळी ऋषभ स्वत: गाडी चालवत होता आणि कारमध्ये तो एकटाच होता. ज्याठिकाणी हा अपघात घडला, ती जागा अपघातप्रवण क्षेत्र असल्याचं म्हटलं जातंय.
ऋषभवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. ऋषभची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर कारला आग लागली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. आज (शुक्रवारी) सकाळी ऋषभ त्याच्या गाडीने दिल्लीहून रुडकीच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली.