CWG 2022 साठी भारतीय पथकाची घोषणा, 215 खेळाडूंकडून 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा
CWG 2022: बर्मिंघम (Birmingham) मध्ये 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धा (CWG 2022) सुरु होणार आहे. एकूण 215 खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 130 कोटी भारतीयांच प्रतिनिधीत्व करणार आहेत.
मुंबई: बर्मिंघम (Birmingham) मध्ये 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धा (CWG 2022) सुरु होणार आहे. एकूण 215 खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 130 कोटी भारतीयांच प्रतिनिधीत्व करणार आहेत. या खेळाडूंना सहाय्य करण्यासाठी 100 पेक्षा जास्त कोचिंग स्टाफ आणि अधिकारी असतील. शनिवारी भारतीय ऑलिंम्पिक संघाने CWG 2022 साठी 215 खेळाडू आणि 322 सदस्यांच्या पथकाची घोषणा केली. खेळाडूंसोबत या पथकामध्ये 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ आहेत. 28 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेच इंग्लंडच्या प्रसिद्ध बर्मिंघम शहरात आयोजन करण्यात येणार आहे.
प्रदर्शन सुधारण्यावर नजर
2018 साली ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर होता. “यावेळी कामगिरीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. आम्ही आमचं मजबूत पथक पाठवलं आहे. नेमबाजीत भारत नेहमीच अव्वल असतो, पण यावेळी नेमबाजीचा समावेश करण्यात आलेला नाही. पण तरीही आम्हाला यंदा चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे” असं IOA महासचिव राजीव मेहता म्हणाले.
IOA ने सरकारचे आभार मानले
भारतीय बॉक्सिंग संघाचे उपाध्यक्ष राजेश भंडारी टीमच्या शेफ डी मिशनचे पथक प्रमुख आहेत. IOA च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अॅथलीट्स आणि महासंघांच समर्थन करण्यासाठी सरकारचे आभार मानले आहेत. “पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने खेळांना अभूतपूर्व समर्थन दिलं आहे. ऑलिम्पिंक मधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शनातून हे दिसून येतं” असं राजीव मेहता म्हणाले.
215 athletes and 107 officials will represent @WeAreTeamIndia as part of 322 strong Contingent for @birminghamcg22 #weareteamindia #indianolympicassociation #commonwealthgames2022 #Birmingham2022 pic.twitter.com/kbNWGUJeQT
— Team India (@WeAreTeamIndia) July 16, 2022
या दिग्गजांवर नजर
यावेळी कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये अनेक मोठी नावं आहेत. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, त्याशिवाय टोक्यो मध्ये मेडल जिंकणारी पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन, बजरंग पुनिया आणि रवी कुमार दाहिया यांचा समावेश आहे. CWG चॅम्पियन मनिका बत्रा, विनश फोगाटसह हिमा दास आणि अमित पंघालकडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत.
15 खेळांमध्ये होणार सहभागी
भारतीय क्रिडापटू 15 खेळ आणि चार पॅरा खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, वेटलिफ्टिंग, महिला क्रिकेट आणि कुस्ती या पारंपारिक खेळांकडून पदकाची अपेक्षा आहे. महिला क्रिकेट मधील टी 20 प्रकाराचा पहिल्यांदा कॉमनवेल्थ मध्ये समावेश करण्यात आला आहे. काही भारतीय खेळाडू आधीच बर्मिंघम मध्ये दाखल झाले आहेत.