Virat Kohli : ‘मुंबईच्या क्रिकेटर्सकडून प्रेरणा घे’, वाईट काळात विराटला क्रिकेटच्या जाणकाराकडून मोलाचा सल्ला
Virat Kohli : विराट कोहली आता किंग राहिलेला नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण ऑस्ट्रेलियातील त्याच्या प्रदर्शनाचे आकडेच हे सांगतायत. आता विराट कोहलीला क्रिकेटच्या एका जाणकाराने मुंबईच्या क्रिकेटपटूंपासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला आहे. विराट कोहलीला असा सल्ला का दिला? त्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या.
मुंबईच्या क्रिकेटपटूंच आचरण करांव आणि विराट कोहलीने दिल्लीच्या आगामी रणजी करंडक सामन्यासाठी उपलब्ध रहावं, असं दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनचे सचिव अशोक शर्मा यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मुंबईच्या क्रिकेट टीमसोबत वानखेडे स्टेडियमवर प्रॅक्टिस करताना दिसला. 23 जानेवारीपासून मुंबईचा जम्मू-काश्मीवर विरुद्ध सामना होणार आहे, त्यात खेळण्यासाठी रोहित शर्माने अजून होकार दिलेला नाही. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दिल्ली टीमच्या संभाव्य रणजी संघात विराट कोहली आणि ऋषभ दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय असं डीडीसीएचे सचिव इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.
“विराट आणि ऋषभ दोघांच्या नावाचा संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आलाय. रणजी ट्रॉफीसाठीच शिबिर सुरु आहे. विराटने मुंबईच्या क्रिकेटर्सपासून प्रेरणा घेऊन उपलब्ध असेल तेव्हा त्याने दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळले पाहिजेत” असं अशोक शर्मा म्हणाले. “मुंबईमध्ये तुम्ही पाहू शकता, भारताकडून खेळणारे क्रिकेटर्स उपलब्ध असतात तेव्हा ते त्यांच्या रणजी संघासाठी खेळतात. हे उत्तरेकडे खासकरुन दिल्लीमध्ये असं होतं नाही” अशी खंत अशोक शर्मा यांनी बोलून दाखवली.
स्टार कल्चर संपवण्याची मागणी
“चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व्यस्त होण्याआधी कोहली आणि पंतने उर्वरित दोन पैकी एक सामना तरी खेळावा” असं अशोक शर्मा म्हणाले. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील दारुण पराभवानंतर टीम इंडियातील स्टार कल्चर संपवण्याची मागणी होत आहे. भारताचे मोठे क्रिकेटपटू रणजी सामन्यांकडे पाठ फिरवतात त्यावरुन भारतीय क्रिकेट वर्तुळात बरीच टिकाटिप्पणी सुरु आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय सामने नसतील, तेव्हा नेहमी मुंबईकडून रणजी सामने खेळायचा.
ऑस्ट्रेलियातील प्रदर्शन किंग सारखं नाही
देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे असं बीसीसीआयने सुद्धा म्हटलं आहे. “विराट आणि ऋषभने एकतरी सामना खेळला पाहिजे असं मला वाटतं. पण ते असं करतील हे मला वाटत नाही” असं अशोक शर्मा म्हणाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने निराशाजनक प्रदर्शन केलं. पर्थममध्ये त्याने एक सेंच्युरीत झळकवली. पण उर्वरित मालिकेत मिळून त्याने फक्त 90 धावा केल्या. तो आता किंग राहिलेला नाही, अशी विराटवर ऑस्ट्रेलियात टीका झाली होती.