#DhoniKeepTheGlove : ग्लोजवर ‘बलिदान बॅज’ लावणाऱ्या धोनीच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर मोहीम
धोनीला 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टिनंट कर्नल ही मानद उपाधी मिळाली आहे. शिवाय धोनीने त्याच्या रेजिमेंटसोबत विशेष ट्रेनिंगही घेतली होती.
मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू महेंद्रसिंह धोनी सध्या ग्लोजवरील पॅरा मिलिट्रीच्या ‘बलिदान बॅज’मुळे वादात अडकला आहे. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यादरम्यान धोनीने यष्टीरक्षणासाठी घातलेल्या ग्लोजवर पॅरा मिलिट्रीचा लोगो होता. या लोगोला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आक्षेप घेतला आणि तसे बीसीसीआयला कळवले. मात्र, आता सोशल मीडियावरुन #DhoniKeepTheGlove अशी मोहीम राबवली जात आहे. आयसीसीचा निषेधही व्यक्त करण्यात येत आहे.
धोनीच्या हातावर असलेला लोगो तातडीने हटवण्यात यावा, असं आवाहन आयसीसीने बीसीसीआयला केलं आहे. आयसीसीचे महासंचालक आणि रणनीती समन्वयक क्लेयर फरलोंग यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर बीसीआयने आयसीसीला दिलेल्या उत्तरात म्हटलंय की, “आम्ही आमच्या खेळाडूंच्या बाजूने आहोत. ‘बलिदान बॅज’ हे कुठल्याही धर्माचं प्रतिक किंवा व्यावसायिक चिन्ह नाही.”
सोशल मीडियावर मात्र महेंद्रसिंह धोनीचे चाहते आणि इतरही नामवंत व्यक्तींनी #DhoniKeepTheGlove या हॅशटॅग मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. सिनेमा, क्रीडा क्षेत्रांसह अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी ट्वीट करुन, धोनीला पाठिंबा दिला आहे.
#MSDhoni प्रादेशिक सेना में प्रशिक्षित #Paratrooper हैं, इस #बलिदानबैज को #धोनी ने अपनी काबिलियत से हासिल किया है।इस बैज को हटाने की #ICC की मांग ना सिर्फ भारतीय सेना का, बल्कि भारतीय सेना के बलिदान का अपमान है। हम सब देशवासी धोनी के साथ है। #DhoniKeepTheGlove @msdhoni @ICC @BCCI pic.twitter.com/syUhTW7OeJ
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) June 7, 2019
महेंद्रसिंह धोनीचा मला अभिमान आहे. त्याने ‘बलिदान बॅज’ कायम ठेवायला हवं, असे पैलवान योगेश्वर दत्त म्हणाला. तसेच, माजी हॉकी खेळाडू सरदार सिंह, सुशील कुमार यांच्यासारखे क्रीडापटूही धोनीच्या समर्थनात उतरले आहेत. ‘बलिदान बॅज’ परिधान करणं सन्मानाची बाब आहे, आयसीसीने अशाप्रकारे आक्षेप घ्यायला नको, असे सर्वच खेळाडूंचे म्हणणे आहे.
Indian Army has always been independent irrespective of the political party in power. We are proud of them. Lt. Col. @msdhoni has worn the Army insignia as a symbol of pride. Doesn’t hurt anyone’s sentiments, In fact it honours the brave #DhoniKeepTheGlove #WorldCup2019
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 7, 2019
अभिनेता रितेश देशमुख याच्यासह अनेक सिनेकलाकारांनीही महेंद्रसिंह धोनीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ट्वीट, पोस्ट शेअर केल्या आहेत.
‘बलिदान बॅज’ काय आहे?
पॅरा मिलिट्रीच्या जवानांकडे ‘बलिदान बॅज’ नावाचं वेगळं बॅज असतं. ‘बलिदान’ असे या बॅजवर देवनागरी लिपीत लिहिलेलं असतं. चांदीपासून बनललेल्या या बॅजच्या वरील बाजूस लाल प्लास्टिकचं आवरण असतं. केवळ पॅरा कमांडोंकडे हे बॅज असतं.
धोनीकडे ‘बलिदान बॅज’ कसं?
धोनीला 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टिनंट कर्नल ही मानद उपाधी मिळाली आहे. शिवाय धोनीने त्याच्या रेजिमेंटसोबत विशेष ट्रेनिंगही घेतली होती. सैन्याविषयीचा आदर धोनीने वेळोवेळी बोलून दाखवलेला आहे. सैन्यात जाण्याची इच्छा त्याने अनेकदा बोलूनही दाखवलेली आहे.