Shahid Afridi : ‘तुम्ही तुमची घमेंड….’, चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद, शाहीद आफ्रिदीने भारताला सुनावलं
Shahid Afridi : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याच सांगितलं आहे. त्यावर दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये वाद वाढत चालला आहे. आता शाहीद आफ्रिदीने भारताच नाव न घेता निशाणा साधला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डामध्ये वाद वाढत चालला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याच सांगितलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटर्सचा पार चढला आहे. सतत वक्तव्य सुरु आहेत. आता या वादात दिग्गज क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने उडी घेतली आहे. त्याने भारताच नाव न घेताच निशाणा साधला आहे. आफ्रिदी म्हणाला की, ‘चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेटमधील महत्त्वाचा टप्पा आहे’ आफ्रिदीच्या मते, 1970 च्या दशकानंतर क्रिकेट पहिल्यांदा सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. बीसीसीआयच नाव न घेता शाहिद आफ्रिदीने घमेंड नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला. आफ्रिदीच्या आधी बासित अली आणि रशीद लतीफसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्स या विषयावर बोलले आहेत.
शाहीद आफ्रिदी म्हणाला की, “क्रिकेट एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. कदाचित 1970 नंतर मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे” “आपले मतभेद विसरुन खेळासाठी एक व्हायची हीच वेळ आहे” असं शाहीद आफ्रिदीने म्हटलय. “ऑलिंम्पिकसाठी आपण विभाजन विसरुन एकत्र येऊ शकतो, तर हेच आपण क्रिकेट आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी का करु शकत नाही?” असा सवाल आफ्रिदीने विचारला. शाहीद आफ्रिदी फक्त सल्ला देऊन थांबला नाही. त्याने पुढे भारताच नाव न घेता निशाणा साधला. “या खेळाचे संरक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की, घमेंड नियंत्रणात ठेवा आणि क्रिकेटच्या विकासावर फोकस करा” असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.
पाकिस्तानच यात काय नुकसान आहे?
जवळपास 28 वर्षानंतर पाकिस्तान ICC स्पर्धेच यजमानपद भूषवणार आहे. यासाठी खर्च सुद्धा झाला आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पीसीबीला या स्पर्धेतून भरपूर कमाई होईल अशी अपेक्षा होती. पण बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचं मोठ नुकसान होऊ शकतं. आता त्यांच्याकडे तीन पर्याय आहेत. हायब्रिड मॉडलची मागणी मान्य करावी लागेल, अन्यथा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दुसऱ्या देशात शिफ्ट होईल. दोन्ही बोर्डांमधील वाद वाढल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अनिश्चितकाळासाठी टाळली जाईल. या तिन्ही स्थितीत पाकिस्तानच नुकसान होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात शिफ्ट झाल्यास किंवा रद्द झाली, तर फी मिळणार नाही. सोबतच स्टेडियमवर केलेल्या खर्चाच नुकसान होईल.