…आणि गिरीश महाजनांकडून महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी तात्काळ विमानाची व्यवस्था
"मी सांगितलं, लागतील तेवढे शूज द्या. चार जोडी लागूं दे किंवा पाच. आपण सुविधा देत नसू, तर मेडलची अपेक्षा करण चुकीच आहे" असं गिरीश महाजन म्हणाले.
मुंबई : “खेळात महाराष्ट्र एक नंबरवर असला पाहिजे. खेलो इंडियाच यंदा भोपाळमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. तिथे मेडलमध्ये आपण एक नंबरवर आहोत. दोन महिन्यांपूर्वी अहमदाबादला राष्ट्रीय स्पर्धा झाल्या, तिथे महाराष्ट्राचा पहिला नंबर आला. देशात सध्या महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे” असं राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. “शासनाकडून कुठलीही कमतरता ठेवली जाणार नाही. म्हणून आम्ही ठराविक खेळांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत” असं गिरीश महाजन म्हणाले.
टीव्ही 9 मराठी प्रायोजित महाराष्ट्राचा महासंकल्प मिशन वर्ल्ड कप कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी हे विचार व्यक्त केले. नुकतीच एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा पार पडली. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.
बक्षिसाची रक्कम 10 लाखावरुन 50 लाख
“ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो, महाराष्ट्र पुढे कसा राहिलं. महाराष्ट्राचे खेळाडू जास्तीत जास्त मेडल कसे मिळवतील, तो आमचा प्रयत्न आहे” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. “आम्ही लवचिक धोरण स्वीकारलय. आधी कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये खेळाडू गोल्ड मेडल घेऊन आले, की त्यांना 10 लाख मिळायचे. मी मंत्री झालो, आमचं सरकार आलं. आम्ही 10 लाखावरुन बक्षिसाची रक्कम 50 लाख रुपये केली. पाचपट वाढ केली” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी विमान प्रवास
“आधी आमचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांसाठी ट्रेन-बसने जायचे. बारा-चौदा तास प्रवासात जायचे. खेळाडू थकून-भागून जायचे, त्यांच्याकडून आम्ही मेडलची अपेक्षा कशी करायची? आता सगळे खेळाडू तासाभरात विमामाने स्पर्धास्थळी पोहोचतात” असं गिरीश महाजन म्हणाले. “आम्ही मेडलची अपेक्षा करतो. पण सोयी-सुविधा काही देत नाही. म्हणून खेळाडूंना सोयी-सवलती देणं आवश्यक आहे” असं गिरीश महाजन म्हणाले. लागतील तेवढे शूज द्या
“काही एथलिट्सना मी भेटलो, त्यांनी सांगितलं की, शू ची एक जोडी मिळते. दोन महिन्यात हे शूज फाटतात. आम्ही 10 महिने विनाशूज पळतो. मी सांगितलं, लागतील तेवढे शूज द्या. चार जोडी लागूं दे किंवा पाच. आपण सुविधा देत नसू, तर मेडलची अपेक्षा करण चुकीच आहे” असं गिरीश महाजन म्हणाले.