Neeraj Chopra : ‘मी माझ्या बाजूने सर्वोत्तम दिलं, पण..’, रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरजची पहिली प्रतिक्रिया काय? VIDEO
Neeraj Chopra : भारताच्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेती कामगिरी केली आहे. त्याने भालाफेकीत हे पदक जिंकलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला. त्याने सुवर्ण पदक मिळवलं. नीरजला आज टोक्यो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करता आली नाही. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं होतं.
पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक विजेती कामगिरी केली आहे. भालाफेकीमध्ये त्याने हे यश मिळवलं. नीरजकडून सर्वांना सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण नीरजला टोक्यो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करता आली नाही. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्ण पदक मिळालं. नीरजने 89.45 अंतरावर थ्रो करुन रौप्य पदकाला गवसणी घातली. तेच पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन सुवर्ण पदक मिळवलं. अर्शद नदीमने इतक्या दूर अंतरावर थ्रो करुन एक नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला.
याआधीचा भालाफेकीत ऑलिम्पिक रेकॉर्ड 90.57 मीटरचा होता. नॉर्वेच्या खेळाडूने 2008 बिजींग ऑलिम्पिकमध्ये हा रेकॉर्ड रचला होता. हे रेकॉर्ड करणारा थोरकीलसेन नीरज-अर्शदची फायनल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये त्यावेळी उपस्थित होता. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक विजेती कामगिरी करणारा नीरज चोप्रा भारताचा तिसरा खेळाडू आहे. कुस्तीपटू सुशील कुमारने 2008, 2012 मध्ये आधी कांस्य मग रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने 2016 आणि 2021 मध्ये अशीच पदक विजेती कामगिरी केली होती.
#WATCH | Paris: On winning a silver medal in men’s javelin throw at #ParisOlympics2024, Ace javelin thrower Neeraj Chopra says, “We all feel happy whenever we win a medal for the country…It’s time to improve the game now…We will sit and discuss and improve the… pic.twitter.com/kn6DNHBBnW
— ANI (@ANI) August 9, 2024
नीरज चोप्रा काय म्हणाला?
आज रौप्य पदक विजेती कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या. “देशासाठी पदक विजेती कामगिरी करतो, तेव्हा आपण सर्व आनंदी असतो. थ्रो मध्ये आणखी सुधारणा करण्याची वेळ आहे. टीमसोबत बसून चर्चा करीन आणखी कामगिरीत सुधारणा करु. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा खूप तगडी होती. भारताने चांगलं प्रदर्शन केलय. मी माझ्या बाजूने सर्वोत्तम दिलं. पण आज अर्शदचा दिवस होता. पण काही जागा अशा आहेत, जिथे अजून सुधारणा आवश्यक आहे” असं नीरज चोप्रा म्हणाला. “आज आपलं राष्ट्रगीत वाजलं नाही. पण भविष्यात नक्कीचे ते ऐकू येईल. ते ठिकाण पॅरिस नसलं तरी दुसरी एखादी जागा असेल” असं नीरज चोप्रा म्हणाला. “माझा सर्वोत्तम थ्रो अजून बाकी आहे. मी ज्यावेळी पूर्णपणे फिट असेन त्यावेळी निश्चित हे घडेल” असं नीरज म्हणाला.