IND vs AUS : विजयाच्या आनंदात ऑस्ट्रेलियाला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू पुढील सामन्याला मुकणार?
ऑस्ट्रेलियान संघातील अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसला दुखापत झाली आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला (IND vs AUS) थाटात सुरुवात केली आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 66 रन्सनी पराभूत केलं. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने प्रत्येक आघाडीवर शानदार कामगिरी नोंदवली. याचदरम्यान ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसला (Marcus Stoinis) दुखापत झाली आहे. चालू मॅचमध्येच त्याला मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं. आता दुसऱ्या वनडे मॅचमध्ये तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जातीये. (IND vs AUS Austrelian all rounder Marcus Stoinis injured on fisrt ODI may not play second match)
ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करताना 374 धावांचा डोंगर उभा केला. अॅरॉन फिंच (Aron Finch) आणि स्टीव्हन स्मिथने (Steven Smith) धडाकेबाज शतके झळकावली तर वॉर्नर (David Warner) आणि मॅक्सवेलने (Glenn Maxwell) नेत्रदिपक फटके मारत कोरोनानंतर पहिल्यांदाच मैदानात आलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतर बोलर्सनेही उत्तम कामगिरी करत भारताला विजयापासून रोखलं. याच दरम्यान मार्कस स्टॉयनिसला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं.
ऑस्ट्रेलियन मीडियाच्या रिपोर्टनुसार मार्कस स्टॉयनिसला जास्त दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात स्टॉयनिस खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का मानला जात आहे.
भारतीय संघाची बॅटिंग सुरु असताना स्टॉयनिसला दुखापत झाली. डावातील सातव्या षटकातील दुसरा बॉल फेकल्यानंतर त्याला वेदना होऊ लागल्या. याचवेळी त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचे राहिलेले चार बॉल ग्लेन मॅक्सवेलने फेकले.
क्रिकेट एयूच्या वृत्तानुसार, “स्टॉयनिसच्या पोटाच्या डाव्या बाजूला वेदना होत आहेत. त्याला नेमकी काय आणि कशी दुखापत झाली आहे, हे सध्या तरी समजू शकलेलं नाही, परंतु त्यासाठीच त्याचं स्कॅन करण्यात येईल”.
सामन्यानंतर स्टॉयनिसच्या तब्येतीविषयी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्हन स्मिथला विचारलं असता तो म्हणाला, “स्टॉयनिसची तब्येत कशी आहे, हे सध्या तरी मला माहिती नाही. परंतु आशा आहे की तो बरा असेल. पण जर त्याला मोठी दुखापत झाली असेल तर त्याच्याजागी कॅमरुन ग्रीन खेळेल”
स्टॉयनिसला झालेली दुखापत ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे. कारण पाठीमागच्या काही काळापासून स्टॉयनिस चांगल्या फॉर्मात आहे. परंतु अशा परिस्थितीतही ऑस्ट्रेलियाकडे ऑलराऊंडरचे काही पर्याय आहेत. जर पुढच्या मॅचमध्ये स्टॉयनिस खेळला नाही तर कॅमरुन ग्रीन किंवा हेनरिक्सला संधी मिळू शकते, असा अंदाज आहे.
(IND vs AUS Austrelian all rounder Marcus Stoinis injured on fisrt ODI may not play second match)
संबंधित बातम्या
हार्दिक पांड्याचा टीम इंडिया आणि कर्णधार कोहलीला मोठा धक्का, म्हणाला, ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’