IND vs AUS : एडिलेड टेस्ट आधी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी, स्टार फलंदाजाला दुखापत
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना लवकरच सुरु होणार आहे. पर्थच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. त्यांच्या स्टार फलंदाजाला दुखापत झाली आहे.
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. एकूण पाच कसोटी सामने या सीरीजमध्ये खेळले जातील. पहिला कसोटी सामना मागच्या महिन्यात पर्थ येथे झाला. पर्थ कसोटीत भारताने शानदार विजयाची नोंद केली. आता एडिलेड येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे. पिंक बॉलने खेळली जाणारी ही डे-नाईट टेस्ट मॅच आहे. या टेस्ट मॅचआधी ऑस्ट्रेलियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. स्टार फलंदाज स्टीव स्मिथला दुखापत झाली आहे. स्मिथला प्रॅक्टिस दरम्यान दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं. एडिलेट टेस्ट मॅच 6 डिसेंबरपासून सुरु होतेय. त्याआधी स्मिथला दुखापत होणं ही ऑस्ट्रेलियासाठी चांगली बातमी नाहीय. स्टीव स्मिथला ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा कणा मानतात.
नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरु असताना अचानक स्मिथच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. मार्स लाबुशेन त्याला थ्रो डाऊनची प्रॅक्टिस देताना ही दुखापत झाली. दुखापत होताच स्मिथ विव्हळला. त्यानंतर त्याला नेटमध्ये थांबण कठीण झालं. त्याला मैदान सोडावं लागलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार नेट्समधून बाहेर पडलेल्या स्मिथच्या दुखापतीचा फिजियोने आढावा घेतला. त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी दुखापतीची पहिली बाब नाहीय. याआधी दुखापतीमुळे जोश हेझलवूडच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला फटका बसला आहे. साइड स्ट्रेनमुळे तो एडिलेड कसोटीत खेळू शकणार नाहीय.
स्टीव स्मिथ पिंक बॉलबद्दल काय म्हणाला?
दुखापतग्रस्त होण्याआधी स्टीव स्मिथने पिंक बॉलने टेस्ट मॅच खेळण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. रेड बॉलच्या तुलनेत पिंक बॉलने खेळताना जास्त लक्ष द्यावं लागतं. या चेंडूला जज करणं कठीण असतं. सीम आणि स्विंग जास्त वेळ होत असल्याने पिंक बॉलवर फलंदाजी करणं सोपं नसतं.
भारतीय टीमसाठी चांगली बाब काय?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एडिलेड येथे पिंक बॉलने 6 ते 10 डिसेंबर दरम्यान टेस्ट मॅच होणार आहे. यासाठी दोन्ही टीम मैदानावर घाम गाळत आहेत. भारतीय टीमसाठी चांगली बाब ही आहे की, सध्या तरी दुखापतीच कुठलही प्रकरण नाहीय. रोहित शर्मा परतल्याने टीमची ताकद वाढली आहे. भारतीय कॅप्टन कुठल्या नंबरवर बॅटिंगला येणार, त्याची उत्सुक्ता आहे.