IPL 2023 : आरसीबी विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा तेंडुलकरला देणार संधी ! अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार आहे. तर 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार आहे. पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेला मुंबईचा संघ मागच्या पर्वात गुणतालिकेत एकदम शेवटी होता. त्यामुळे या पर्वात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. स्पर्धेपूर्वीच मुंबई इंडियन्स संघाला काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे ग्रहण लागलं आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या आयपीएल पर्वात खेळणार नाही. त्यामुळे रोहित एका चांगल्या गोलंदाजाच्या शोधात आहे.
अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीतही माहिर आहे. गेल्या दोन पर्वांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सनं 2021 मध्ये बेस प्राईसवर त्याला खरेदी केलं होतं. त्यानंतर मागच्या वर्षी लिलावात 30 लाखांची बोली लावली होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून अर्जुन तेंडुलकरकडे पाहिलं जातं.
अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये रणजी ट्रॉफीच्या जोरावर पोहोचला आहे. रणजी डेब्यू सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. तसेच 7 फर्स्ट क्लास सामने खेळत 12 गडी बाद केले होते. अर्जुन तेंडुलकरने सात सामन्यात एकूण 233 धावा केल्या आहेत. 9 टी 20 सामने खेळत 12 गडी बाद केले आहेत आणि 20 धावा केल्या आहेत.
अष्टपैलू खेळाडू म्हणून अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान मिळू शकते. सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरेल. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये डेवाल्ड ब्रेविस, चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादव, पाचव्या स्थानावर तिलक वर्मा, सहाव्या स्थानावर अष्टपैलू कॅमरून ग्रीन आणि सातव्या स्थानावर अर्जुन तेंडुलकरला संधी मिळू शकते.
फिरकीपटू पियुष चावला, शम्स मुलानी यांना संधी मिळेल. जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांना अर्जुन तेंडुलकरची साथ मिळू शकते. बुमराहची जागा भरून काढण्यासाठी अर्जुन अस्त्र वापरण्याचा रोहित शर्मा विचार करू शकतो.
आरसीबी विरुद्ध प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, शम्स मुलानी, जेसन बेहरेनडॉर्फ
आयपीएल 2022 पर्वात मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होता. स्पर्धेतील 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला होता. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचा संघ तळाशी राहिला आहे.