Ashwani Kumar : एकारात्रीत नाही घडला अश्वनी कुमार, मुंबई इंडियन्सच्या नव्या स्टारची पडद्यामागची गोष्ट
Ashwani Kumar : पहिल्या सामन्यात विग्नेश पुथुर आणि आता अश्वनी कुमारची चर्चा आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामन्यात आपला नवीन स्टार दाखवला. काल केकेआर विरुद्धच्या सामन्यात MI ने त्यांचं भविष्य दाखवलं. पहिल्याच सामन्यात मुंबईकडून खेळताना अश्वनी कुमारने कमाल केली. पण हे सर्व एकरात्रीत घडलेलं नाही. पडद्यामागची ही गोष्ट वाचा.

इंडियन प्रीमियर लीग एक अशी स्पर्धा आहे, जिथे तुमच्या टॅलेंटला न्याय मिळतो, संधी मिळते. भरपूर पैसा असलेल्या या लीगने एकारात्रीत अनेकांना स्टार बनवलय. आता या यादीत मुंबई इंडियन्सचा युवा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारच नाव जोडलं गेलय. 23 वर्षाच्या या युवा गोलंदाजाने काल मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकाता नाइट रायडर्सचा डाव 17 ओव्हर्समध्ये 116 धावांवर आटोपला. अश्वनी कुमार अचानक एकाएकी चर्चेत आल्यामुळे तो कोण आहे? कुठल्या राज्यातला आहे? असे अनेक प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात निर्माण झालेत. अश्वनी कुमार हा मूळचा पंजाबचा आहे. अश्वनीच्या वडिलांची गावी दीड एकर शेती आहे. त्याच्या वडिलांनी मुलाच्या काही आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी अश्वनीला मी घराकडून स्टेडियममध्ये जाण्यासाठी दिवसाला 30 रुपये द्यायचो, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.
अश्वनी कुमारने काल केकेआर विरुद्ध सामन्यात अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, आंद्रे रसेल आणि मनिष पांडे असे मोठे विकेट घेतले. चार ओव्हर्समध्ये 24 धावा देऊन त्याने चार विकेट काढले. “कडाक्याच ऊन असो, वा पाऊस मोहालीच्या पीसीए आणि त्यानंतर मुल्लानपूरच्या स्टेडियमवर जाण्याचा त्याता इरादा कधी डळमळीत झाला नाही. कधी कधी तो पीसीएवर सायकलने, कधी एखाद्या वाहनात लिफ्ट घेऊन किंवा कधी शेअर रिक्षाने जायचा” असं हरकेश कुमार यांनी सांगितलं.
‘तो एक-एक विकेट घेत असताना, मला ते दिवस आठवले’
“मला आठवतय प्रवास तिकीटासाठी म्हणून तो माझ्याकडून 30 रुपये घ्यायचा. मेगा ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने 30 लाखात विकत घेतलं, मला माहितीय त्याला त्या प्रत्येक पैशाच मुल्य ठाऊक आहे. आज जेव्हा तो एक-एक विकेट घेत होता, त्यावेळी मला ते दिवस आठवले, जेव्हा तो ट्रेनिंग संपवून रात्री 10 वाजचा घरी यायचा आणि दुसऱ्यादिवशी सकाळी पुन्हा 5 वाजता उठून जायचा” अशी आठवण त्याच्या वडिलांनी सांगितली.
BRV ब्लास्टर्स कुठली टीम?
केकेआरचा रमणदीप सिंह ज्या अकादमीत घडला, तिथेच अश्वनी कुमार तयार झाला. अश्वनीने 2019 साली रणजीमध्ये डेब्यु केला. फार जणांना माहित नाहीय, पीसीएवरील अकादमीत त्याची अर्शदीप सिंह आणि अभिषेक शर्मासोबत ट्रेनिंग झालीय. शेर-ए-पंजाब T20 टुर्नामेंटमध्ये तो BRV ब्लास्टर्स टीमचा भाग होता. या टीमने 2023 साली ही टुर्नामेंट जिंकलेली.
या भारतीय गोलंदाजाची नजर पडली आणि अश्वनीच नशिब बदललं
अश्वनी कुमार एका सामान्य कुटुंबातून आलाय. तो दुसऱ्या गावात स्थानिक क्रिकेट सामने खेळण्यासाठी जायचा. साधे कॅनव्हासचे बूट घालून बॉलिंग करायचा. चाहत राणा आणि त्याच्या अन्य मित्रांनी त्याला क्रिकेटच्या वस्तू घेऊन देण्यासाठी मदत केली. भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्हीआरव्ही सिंह यांची अश्वनी कुमारवर नजर पडली. त्यांनी अश्वनीला वेगवान गोलंदाज म्हणून घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.