Ind vs Aus Test : बीसीसीआयने कसोटीमधून अखेर ‘या’ खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. 17 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी भारताने एका खेळाडूला रीलीज केलं आहे.
मुंबई : भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील पहिला सामना खिशात घातला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशातच भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. 17 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी भारताने एका खेळाडूला रीलीज केलं आहे. नागपूरमधील कसोटीमध्येही या खेळाडूला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं नव्हतं.
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला बीसीसीआयने रीलीज केलं आहे. रणजी ट्रॉफीमध्ये केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर जयदेवने भारतीय कसोटी संघात जागा मिळवली होती. रणजी स्पर्धेमध्ये सौराष्ट्र संघाने अंतिम सामन्यामध्ये धडक मारली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्यासाठी रीलीज केलं आहे. जयदेव सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे.
सेमीफायनलमध्ये सौराष्ट्रने कर्नाटकचा 4 विकेट्स राखून पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. 16 फेब्रुवारीला रणजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात हा सामना होणार आहे. कर्नाटक संघाने पहिल्या डावामध्ये 407 धावा केल्या होत्या. त्यानंतर सौराष्ट्रने 527 धावा करत आघाडी घेतली, दुसऱ्या डावामध्ये कर्नाटकने 234 धावा केल्या होत्या. सौराष्ट्र संघाने 117 धावा करत हा सामना 4 गडी राखून जिंकला.
NEWS – Jaydev Unadkat released from India’s squad for 2nd Test to take part in the finals of the Ranji Trophy.
More details here – https://t.co/pndC6zTeKC #TeamIndia pic.twitter.com/8yPcvi1PQl
— BCCI (@BCCI) February 12, 2023
दरम्यान, जयदेव उनाडकटने 2010 साली कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र एक कसोटी सामना खेळवल्यानंतर त्याला वगळण्यात आलं होतं. जयदेवने हार मानली नाही त्याने 12 वर्षांनंतर पुन्हा भारतीय संघामध्ये जागा मिळवली होती. 2022 मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला संधी देण्यात आली होती.
- उर्वरित कसोटी सामन्यांचं वेळापत्रक
- दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, दिल्ली
- तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
- चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
भारत कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.