Arshad Nadeem : हे सगळं यश अर्शद नदीमच, पाकिस्तान फक्त नावाला, वाचा गोल्ड मेडलची Inside Story
Arshad Nadeem : पाकिस्तान सारख्या देशात भालाफेकीच्या क्रीडा प्रकारात अर्शद नदीमसारखा वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू तयार होणं ही खूप मोठी बाब आहे. भालाफेक आणि पाकिस्तान यांचा तसा दूरदूरपर्यंत संबंध नाही. अशा एका खेळात पाकिस्तानात अर्शद नदीम कसा घडला? त्याचा ऑलिम्पिक गोल्ड मेडल पर्यंतचा प्रवास किती खडतर होता, पाकिस्तानात त्याने काय परिस्थितीचा सामना केला. त्यासाठी एकदा ही Inside Story वाचा. त्यानंतर तुम्हाला अर्शद नदीम कसा घडला हे लक्षात येईल.
पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटच्या टप्प्यात भारतीयांचा भ्रमनिरास झाला. त्याचवेळी एक आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला. भ्रमनिरास म्हणजे नीरज चोप्राच हुकलेलं सुवर्ण पदक आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे शेजारच्या पाकिस्तानात अर्शद नदीमला मिळालेलं गोल्ड मेडल. नीरज आणि अर्शद दोघेही एकाच क्रीडा प्रकारात आपआपल्या देशाच प्रतिनिधीत्व करत होते, ते म्हणजे जॅवलिन थ्रो. मराठीत या खेळाला भालाफेक म्हणतात. हा प्राचीन खेळ आहे. जॅवलिनचा वापर हा युद्धापासून सुरु झाला. पुढे तो खेळामध्ये बदलला. मागच्या 2020 टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यानंतर जॅवलिन थ्रो च्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नीरजने वर्चस्व गाजवलं. पॅरिस ऑलिम्पिकच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्येच नीरजचे दमदार सुरुवात केली होती. क्वालिफिकेशनसाठी 84 मीटरची मर्यादा होती. पण नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर अंतरावर थ्रो करुन पहिलं स्थान मिळवलं. त्यामुळे टोक्योप्रमाणे नीरज चोप्रा पॅरिसमध्येही गोल्ड मेडल मिळवणार असा सर्व भारतीयांना विश्वास होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम सुद्धा पात्र ठरला. त्याने पहिल्याच प्रयत्नात 86.59 मीटर अंतरावर भाला फेकला. क्वालिफिकेशन राऊंडमधील या प्रदर्शनामुळे कोणालाही असं वाटलं नव्हतं की, अर्शद नदीम सुवर्ण पदक मिळवेल. सर्वांनाच विश्वास होता की, नीरजच जिंकणार. पण अर्शद नदीमने मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत सगळ्यांनाच धक्का दिला. त्याने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन फक्त सुवर्ण पदकच मिळवलं नाही, तर नवीन ऑलिम्पिक रेकॉर्डही रचला.
खरंतर तो दिवसच अर्शद नदीमचा होता, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. कारण अर्शद नदीमने त्या दिवशी पाच लीगल थ्रो केले. त्यात दोन थ्रो 90 प्लस होते. नदीमने शेवटच्या प्रयत्नात 91.79 मीटर अंतरावर थ्रो केला. नदीमने पहिल्या प्रयत्नात फाऊल केलेला. तिसऱ्या प्रयत्नात नदीमने 88.72 मीटर, चौथ्या प्रयत्नात 79.40 मीटर थ्रो आणि पाचव्या प्रयत्नात 84.87 मीटर अंतरावर थ्रो केला. तेच नीरज चोप्राचा दुसरा थ्रो वगळता अन्य सर्व थ्रो मध्ये फाऊल होता. फायनलमध्ये नीरजचा सर्वोत्तम थ्रो 89.45 मीटर होता. दुसऱ्या स्थानासह नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अर्शद नदीमच्या करियरचा ग्राफ बघितला, तर हळूहळू वाढत गेलाय. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अर्शद नदीम फायनलसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी तो पाचव्या स्थानावर राहिलेला. 84.62 मीटर अंतरावर त्याने थ्रो केलेला. त्यानंतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत राहिल्यामुळे त्याला अनुभव मिळाला. आत्मविश्वास वाढला. 7 ऑगस्ट 2022 रोजी अर्शदने कॉमन वेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकून भविष्याची चुणूक दाखवली. त्यावेळी पाचव्या प्रयत्नात त्याने 90 मीटर अंतर पार केलं होतं. मागच्यावर्षी बुडापेस्ट हंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहून त्याने रौप्य पदक मिळवलं. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरजने 88.17 मीटर अंतरावर थ्रो करुन गोल्ड मेडल मिळवलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जॅवलिन थ्रो च्या क्वालिफेकशन राऊंडवरुन अर्शद नदीम गोल्ड मेडल जिंकणार असं कोणीही छातीठोकपणे म्हटलं नसतं.
ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने एकूण किती मेडल्स मिळवली आहेत?
अर्शद नदीमच आज पाकिस्तानात हिरोसारखं स्वागत होतय, झालं सुद्धा पाहिजे. तो त्याता हक्क, अधिकार आहे. एखाद्या खेळाडूने देशासाठी गोल्ड मेडल जिंकल्यानंतर देशवासियांचा ऊर अभिमानाने भरुन येणं स्वाभाविक आहे. पाकिस्तान सारख्या देशातून एखादा खेळाडू भाला फेक सारख्या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवतो, ही खूप मोठी बाब आहे. कारण पाकिस्तानची क्रीडा संस्कृती सुद्धा क्रिकेट, हॉकीची आहे. क्रिकेटमधला जय-पराजय तिथल्या लोकांच्या मनाला खूप लागतो. पूर्वी ऑलिम्पिकमध्ये भारताला हमखास पदकांची अपेक्षा असायची ती फक्त हॉकीकडून. आता हे चित्र बदललय. भारतीय खेळाडूंनी अन्य खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलय. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पाकिस्तानने एकूण 11 पदकं मिळवली आहेत. त्यात 8 पदकं एकट्या हॉकीमधून आहेत. फक्त तीन मेडल्स व्यक्तीगत स्पर्धांमध्ये मिळाली आहेत. अर्शद नदीम हा पाकिस्तानचा पहिला व्यक्तीगत सुवर्ण पदक विजेता आहे. त्याच्याआधी कोणालाही अशी कमाल करता आलेली नाही. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये मोहम्मद बशीरने कुस्तीच्या 73 किलो वजनी गटात ब्रॉन्झ तर 1988 च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये हुसैन शाह यांनी मिडलवेट बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. त्यामुळे ऑलिम्पिकच्या स्टेजवर अर्शद नदीम सारखा खेळाडू गोल्ड मेडल जिंकतो, पाकिस्तानसाठी खरोखर ही खूप मोठी बाब आहे.
प्रवास एखाद्या चित्रपटातल्या कथानकासारखा
अर्शद नदीमच हे मेडल आज पाकिस्तान मिरवत असला, तरी त्यात त्यांचा वाटा फक्त नावाला आहे. हे सगळं यश एकट्या अर्शद नदीमच आहे. त्याने स्वबळावर इथवर मजल मारली आहे. अर्शदचा ऑलिम्पिक मेडल जिंकण्यापर्यंतचा संघर्ष खूप मोठा आहे. त्यात अनेक अडथळे, आर्थिक संकटं असं बरच काही आहे. अर्शद नदीमने करियरमध्ये हा जो टप्पा गाठलाय, तिथपर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटातल्या कथानकासारखा आहे. हा खडतर संघर्ष एकदा जाणून घ्या.
अर्शदचे पाकिस्तानातील गुरु कोण?
अर्शद नदीमचा जॅवलिन थ्रो चा प्रवास सुरु झाला, तो 2011 पासून. सर्वप्रथम राशीद अहमद साकी यांनी अर्शदमधील भालाफेकीची प्रतिभा हेरली. ते अर्शदचे पहिले कोच आहेत. 2011 च्या हिवाळ्यात तरुण अर्शद मियान चान्नू येथील म्युनसिपल स्टेडियममध्ये विभागीच एथलीट्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेला. त्यावेळी सहा फुटापेक्षा जास्ती उंचीच्या अर्शदने 600 ग्रॅम वजनी भाला ज्या पद्धतीने फेकला, त्याने मी प्रभावित झालो, असं राशीद अहमद यांनी सांगितलं. तू ट्रॅकसूटमध्ये का आला नाहीस? असा प्रश्न मी त्याला केला. त्यावर त्याने आज शाळेला सुट्टी होती, म्हणून असाच आलो असं उत्तर दिलं. अर्शद नदीम राशीद अहमद साकी यांना खूप मानतो. साकी हे स्वत: जॅवलिन थ्रोअर होते. 70 च्या दशकात पंजाब इंटर कॉलेजचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. 69 वर्षीय साकी हे पंजाब एथलिटीस असोशिएशनचे अतिरिक्त सचिव आहेत.
बांबूने प्रॅक्टिस
अर्शदची भालाफेक खेळातील आवड पाहून त्याचे वडील मुहम्मद अश्रफ यांनी साकी सरांना मुलाला प्रशिक्षण देण्याची विनंती केली. अर्शदचे वडील गावात गवंडी काम करतात. म्युनसिपल स्टेडियमशिवाय गावात सरकारी मॉडल स्कूलच मैदान होतं. स्टेडियमच्या गवती मैदानात फुटबॉल आणि हॉकीचे सामने व्हायचे. साकी यांनी अर्शदला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. “मला आठवतय बांबूच्या काठीवर पुढे लोखंडी तुकडा लावून अर्शद शाळेच्या मैदानावर जॅवलिन थ्रो ची प्रॅक्टिस करायचा. गावातल्या लोहाराकडून त्याने तो तुकडा बनवून घेतलेला. काहीवेळा त्या मातीत धावताना तो घसरुन पडायचा” अशी आठवण साकी यांनी सांगितली.
थ्रो इतक्या लांब कि टेप संपली
स्टेडियम किंवा ग्राऊंडमध्ये सराव करताना मुख्य अडचण ही होती की, अर्शदने केलेला थ्रो अनेकदा मैदानाबाहेर जायचा किंवा स्टेडियममधल्या एथलिटीस एरियाच्या बाहेर. 2013 साली मुल्तान येथे विभागीय सामने झाले. त्यावेळी अर्शदने 50 मीटर पेक्षा जास्त अंतरावर थ्रो केला. त्यावेळी ज्यूनियर स्तराच्या मोजणीसाठी असलेली टेप संपली. म्हणजे जितकी टेप होती, त्यापेक्षा पण जास्त अंतरावर अर्शदने थ्रो केला होता.
600 रुपयाचे सेकंड हँड शूज
साकी यांनी अजून एक नीरजची आठवण सांगितली. “लाहोरमध्ये 2014 साली पंजाब युथे फेस्टीव्हलच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अर्शदने पहिल्यांदा पंजाब स्टेडियममधल्या सिंथॅटिकच्या ट्रॅकवर पाऊल ठेवलं. त्यावेळी अर्शदने 57 मीटरपेक्षा लांब थ्रो केला. त्यावेळी नीरजला नवीन शूज आणण्यासाठी साकी यांना तात्काळ लाहोरच्या बाजारात जावं लागलं. जॅवलिन थ्रोअर पॅडेड शूज वापरतात. नीरजनेही तेच शूज घालून उतरावं अशी माझी इच्छा होती. पण 600 रुपयाचे सेकंड हँड शूज मिळाले. अर्शदने त्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं. ते बूट त्याने एक मोठ गिफ्ट म्हणून आजही जपून ठेवले आहेत” अंस साकी म्हणाले.
अशी मिळाली सरकारी नोकरी
त्यानंतर चार महिन्यांनी लाहोरमध्ये पाकिस्तनाच्या पाणी आणि ऊर्जा विभागाकडून जॅवलिन थ्रो च्या चाचण्या घेण्यात येत होत्या. त्यावेळी अर्शदने 800 ग्रॅम जॅवलिनवर हात आजमावला. त्याने 55 आणि 60 मीटर अंतरावर थ्रो केला. त्यामुळे त्याला खेळाडू म्हणून विभागात नोकरी मिळाली. काही महिन्यात अर्शदने 70.46 मीटर अंतरावर थ्रो करुन पाकिस्तानचा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला. WAPDA मधील सरकारी नोकरीमुळे अर्शदला पाचवेळचे नॅशनल चॅम्पियन आणि आशियाई पदक विजेते सयद हुसैन बुखारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेता आले.
अर्धा किलो वजनाच्या बॉलने थ्रो ची सुरुवात
“अर्शदकडे उंची होती. दूर अंतरावर थ्रो करण्यासाठी त्याची ताकद वाढवणं गरजेच होतं, हे माझ्या लक्षात आलं” असं सयद हुसैन बुखारी एका वर्तमानपत्राशी बोलताना म्हणाले. “सुरुवातीला आम्ही अर्धा किलो वजनाच्या बॉलने थ्रो ची सुरुवात केली. त्यानंतर 3 किलो वजनी बॉल पर्यंत पोहोचलो. मी त्याला 200 मीटर, 100 मीटर, 75 मीटर आणि 50 मीटर अंतर पळायला लावायचो. त्याच्या हाताचा कोपरा, मनगट यावर मेहनत घेतली” असं बुखारी यांनी सांगितलं.
मी जर्मनी किंवा फिनलँडमध्ये असतो, तर….
या मेहनतीचा परिणाम दिसू लागला. अर्शद नदीम 78.33 मीटरवरुन 86.38 मीटर पर्यंत पोहोचला. 2021 च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अर्शद पाचव्या स्थानावर होता. टोक्या ऑलिम्पिकमधील प्रदर्शनानंतर अर्शदवर लक्ष गेलं. टोक्योआधी लोक सुजाग चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला. त्यात अर्शदने म्हटलेलं. “सर्व माझा आदर करतात. पण क्रिकेटर्सना जी वागणूक मिळते, ते पाहिल्यावर माझां स्थान काय? हा प्रश्न मला पडतो. मी सरकारला विनंती करतो, मला प्राधान्य द्या. मी जर्मनी किंवा फिनलँडमध्ये असतो, तर वर्ल्ड चॅम्पियन असतो”
चार जॅवलिन देणार सांगितलं, पण प्रत्यक्षात….
2022 मध्ये कॉमनवेल्थमध्ये गोल्ड आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवूनही यावर्षाच्या सुरुवातीला अर्शदला नव्या जॅवलिनसाठी विनंती करावी लागत होती. त्यावेळी एका खासगी क्रीडा कंपनी नेझाने अर्शदला 30 लाखाची स्पॉन्सरशिप दिली. “नेझाच्या स्पॉन्सरशिपने अर्शदला मोठा दिलासा मिळाला. मला त्या सरकारी खात्याच नाव घ्यायच नाहीय. पण टोक्योनंतर त्यांनी नीरजला चार जॅवलिनच आश्वासन दिलेलं. पण प्रत्यक्षात दिली एकच. सहा लाख रुपये किंमतीच्या त्या जॅवलिनने अर्शदने सराव केला” असं साकी यांनी सांगितलं. अर्शदने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी एक फोटो पोस्ट केला. त्यात ते अर्शदला 10 लाखाच चेक देताना दिसले. भारतीय रुपयात या 10 लाखाची किंमत फक्त 3 लाख रुपये आहे. म्हणजे ऑलिम्पिकआधी अर्शदला फक्त 3 लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे अर्शद नदीमच हे यश खूप मोठ आहे. पण ते फक्त त्याचच आहे. त्यात पाकिस्तान सरकार, क्रीडा विभाग आणि व्यवस्थेच योगदान खूप नगण्य, नावाला आहे.