मुंबई: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने गुरुवारी थॉमस कप (Thomas cup) स्पर्धेत इतिहास रचला. भारतीय पुरुष संघाने (Indian Badminton Team) उपांत्यपूर्व फेरीत म्हणजे क्वार्टरफायनलमध्ये मलेशियाला 3-2 ने पराभूत केलं. तब्बल 43 वर्षानंतर थॉमस कप स्पर्धेत भारताला पदक सुनिश्चित झालं आहे. आता भारतीय पुरुष संघाचं कमीत कमी ब्राँझ मेडल निश्चित झालं आहे. पण भारतीय महिला बॅडमिंटन संघाला उबेर कप (Uber Cup) स्पर्धेत मध्ये यश मिळू शकलं नाही. महिला संघाला थायलंड ओपनमध्ये 0-3 ने पराभव स्वीकारावा लागला. ते आता स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. पाच वेळच्या विजेत्या मलेशिया विरोधात भारत विजयाचा प्रबळ दावेदार नव्हता. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पण नंतर त्यांनी कमबॅक केलं. या मॅचआधी भारताने मागच्या दोन सामन्यात क्लीन स्वीप विजय मिळवला होता. मलेशिया विरोधात भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. 46 मिनिटं चाललेल्या लढतीत लक्ष्यला वर्ल्ड चॅम्पियन ली जी जियाने 21-23, 9-21 असं पराभूत केलं होतं. पण भारताने त्यानंतर कामगिरीत सुधारण केली व विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात चिराग आणि सात्विक साईराज जोडीने 13 नंबरचा खेळाडू गोह से फी आणि नूर इजुद्दीन जोडीचा 21-19, 21-15, असा पराभव केला. त्यानंतर श्रीकांतने दुसऱ्या एकेरी सामन्यात विजय मिळवला. श्रीकांतने वर्ल्ड नंबर 46 एनजी त्जे योंगचा 21-11, 21-17 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 45 व्या स्थानावर असलेल्या काबिज कृष्णा प्रसाद गरागा आणि विष्णुवर्धन गौड पंजालाच्या जोडीला आरोचिया आणि टीओ ई यी जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला.
प्रणॉयमुळे टीमचा विजय
विश्व रँकिंगमध्ये 23 व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयने विजयासह पुढच्या फेरीत प्रवेश केला. प्रणॉय 1-6 ने सुरुवातीला पिछाडीवर होता. पण त्यानंतर हुन हाओ लेओंगवर 21-13, 21-8 असा सहज विजय मिळवला. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण कोरिया आणि डेन्मार्कमधील विजेत्याशी होईल.