टी 20 विश्वविजेता क्रिकेट संघाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी दुसरीकडे पैलवानांचे मानधन रखडले, विरोधक सरकारवर बसरले…
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना हिंद केसरी मल्लांना सहा हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे मानधन १५ हजार रुपये करण्यात आले. परंतु गेल्या चार महिन्यांपासून हे मानधन रखडले आहे. राज्यात दहा हिंद केसरी मल्ल आहेत. त्यातील पाच दिवगंत झाले आहेत.
टी 20 विश्वचषक स्पर्धेतील विजयी संघाला महाराष्ट्र सरकारने ११ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. या प्रकरणात राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे हिंद केसरी असलेल्या मल्लांना गेल्या दहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. गडगंज श्रीमंत खेळाडूंना पुन्हा रक्कम देण्याची गरज होती का?. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांना १२५ कोटींची रक्कम दिली असताना राज्याच्या तिजोरीत खळखळाट असताना पैशांची बरसात का? असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहे.
हिंद केसरी मल्लांचे मानधन रखडले
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना हिंद केसरी मल्लांना सहा हजार मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे मानधन १५ हजार रुपये करण्यात आले. परंतु गेल्या चार महिन्यांपासून हे मानधन रखडले आहे. राज्यात दहा हिंद केसरी मल्ल आहेत. त्यातील पाच दिवगंत झाले आहेत. जुन्या काळातील फक्त दिनानाथ सिंह हे एकमेव मल्ल हयात आहेत. तसेच सुमारे ३६ महाराष्ट्र केसरी मल्ल आहेत. त्यांच्या मानधनाची रक्कम तुलनेने किरकोळ आहे. परंतु ती देण्याची संवेदनशीलता क्रीडा विभागाने दाखवली नाही.
विरोधकांनी सरकारला घेरले
क्रिकेटपटूंना ११ कोटी देण्याच्या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडूंना पैसा मिळतो. आयपीएलमधून पैशांची बरसात होते. क्रिकेटपटुंचा गौरव केला पाहिजे, यात काही शंका नाही. पण एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची काय गरज काय? असा प्रश्न या नेत्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
भाजपकडून पलटवार
क्रिकेटपटूंना ११ कोटी देण्याचा निर्णयवर टीका करणाऱ्या विरोधकांना भाजपने सडेतोड उत्तर दिले आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी विजय वड्डेटीवार यांचे विचार संकुचित असल्याची टीका केली आहे. भारतीय खेळडूंचा आनंदात संपूर्ण देश सहभागी झाला. मुंबईतून अतिभव्य रॅली निघाली. परंतु वड्डेटीवार आणि दानवे राजकारण करण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.