Maharashtra Kesari 2023: सिकंदर शेख यांच्या वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया
Maharashtra Kesair 2023: चार पॉइंट दिले त्यांनी, स्वत:च्या लेकरावर हात ठेवून सांगावं, की त्यांनी चुकीचा निर्णय दिला की, योग्य निर्णय दिला?" असा सवाल रशीद शेख यांनी विचारला.
पुणे: दोन दिवसांपूर्वी प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला. शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने फायनलमध्ये महेंद्र गायकवाडचा पराभव केला. फायनलआधी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सेमीफायनलचा सामना झाला. या मॅचच्या निकालाची सोशल मीडियावर चर्चा आहे. महेंद्र गायकवाडला पंचांनी विजेता ठरवलं. सिकंदर शेख पराभूत झाला नव्हता, त्याच्यावर अन्याय झाला असं काही कुस्तीच्या जाणकारांच म्हणणं आहे. सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. आता सिकंदर शेखचे वडिल रशीद शेख यांनी या निकालावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
मी हमालीच काम करायचो
“मी गरीबी अनुभवली आहे. मी गरीबीतून मुलाला पैलवान म्हणून घडवलं. मी हमालीच काम करायचो. पैशांची चणचण होती. पण मुलाला पैलवान म्हणून घडवण्यासाठी कष्ट केले. बारावीपर्यंत इथे शिकवलं. पैलवानीचे धडे दिले. त्यानंतर कोल्हापूरला पाठवलं. फार पैसे नव्हते, तेव्हा काही हितचिंतक पाठिशी उभे राहिले. त्यांनी मदत केली. सिकंदरने नाव कमावलं. पंजाब, हरयाणात सामने जिंकले असं रशीद शेख म्हणाले.
स्वत:च्या लेकरावर हात ठेवून सांगावं, की…
“कुठल्याही गरीबावर अन्याय होऊ नये. कुस्ती भरवणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. पण ज्यांनी चूक केली, चार पॉइंट दिले त्यांनी, स्वत:च्या लेकरावर हात ठेवून सांगावं, की त्यांनी चुकीचा निर्णय दिला की, योग्य निर्णय दिला?” असा सवाल रशीद शेख यांनी विचारला. “कोणाच्याही बाबतीत असा निर्णय होऊ नये. चार-चार वर्ष पेहलवान मेहनत करतात” असं ते म्हणाले. माझ्या एका लेकरावर घर चालतय
“माझ्याकडे काही नाहीय. माझ्या एका लेकरावर घर चालतय. एका लेकराच्या जीवावर दवापानी होतं. मला स्वत:ला बीपी, शुगर आहे. अनेक संकट आलीत. पण आम्ही हार मानली नाही. पुन्हा उभे राहिलो” असं रशीद शेख म्हणाले.