Maharashtra Kesari : चार ताकदवान पैलवान, दोन उपांत्य फेरी, जबरदस्त थरार, अखेर या दोन मल्लांची फायनलमध्ये धडक
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा थरार आज बघायला मिळतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याआधी दोन उपांत्या फेऱ्या देखील अतिशय थरारकच झाल्या.
पुणे : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा थरार आज बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील पैलवानांसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे राज्यभरातून शेकडो पैलवान या ठिकाणी आपलं नशिब आजमवतात. अतिशय मेहनत करुन, प्रत्येक फेरीतून पास होऊन मल्ल या स्पर्धेत पुढे येतात. पुण्यात सुरु असलेल्या या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेतून आज महाराष्ट्राला 65वा महाराष्ट्र केसरी पैलवान मिळणार आहे. त्यासाठी चार जबरदस्त आणि ताकदवान मल्लांनी उपांत्य फेरीत प्रवेश केलेला होता. त्यांच्यामध्ये चुरशीची लढत होऊन 65 वा महाराष्ट्र केसरी पैलवान मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी दोन उपांत्य फेरी देखील पार पडल्या आहेत आणि अंतिम सामन्याचा थरार थोड्याच वेळात सुरु होण्याची शक्यता आहे. मॅट विभागातील शिवराज राक्षे आणि माती विभागातील पुण्याचा महेंद्र गायकवाड यांनी अंतिम लढतीत मजल मारली आहे.
महाराष्ट्र केसरीच्या दोन उपांत्य फेरी देखील अतिशय थरारकच ठरल्या. मॅट विभागातील पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगरचा मल्ल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात चुसशीचा सामना रंगला. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षे याने बाजी मारली.
दुसरी उपांत्य फेरी ही माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात झाली. ही लढत देखील तितकीच थरारक झाली. दोन्ही मल्ल ताकदवान आहेत. पण महेंद्र गायकवाडने अतिशय कुशलतेने 8-2 च्या फरकाने बाजी मारली.
शिवराज राक्षे vs महेंद्र गायकवाड, अंतिम सामन्यात आमनेसामने
पहिल्या उपांत्य फेरीत मॅट विभागाचा शिवराज राक्षे आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत माती विभागाचा महेंद्र गायकवाडने बाजी मारली. त्यामुळे आता या दोन्ही विजयी पैलवानांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात जो विजयी होईल तो महाराष्ट्राचा 65 वा महाराष्ट्र केसरी ठरणार आहे.
‘यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा घ्यायची असा निश्चय’
शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जातोय. दुखापतीतून सावरत त्याने मॅट विभागाची अंतीम लढत गाठली आहे. उपांत्या फेरीत त्याची लढत हर्षवर्धन सदगीर याच्याशी झाली. गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र केसरीसाठी मेहनत घेत आहे. त्यामुळं आता यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा घ्यायची असा निश्चय असल्याचे शिवराज राक्षे याने म्हटले होते. त्यामुळे आता तो गदा मिळवतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महाराष्ट्र केसरीला दिली जाणारी गदा सागाच्या लाकडापासून बनवली जाते. त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. या नक्षीकामासाठी २८ गेज चांदीचा पत्रा वापरला जातो. गदेचे वजन सुमारे ८ ते १० किलो असते. गदेची उंची ही साधारण २७ ते ३० इंच असते. तिचा व्यास ९ ते १० इंच असतो. या गदेवर एका बाजूला हनुमानाचे तर दुसऱ्या बाजूला कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते .