Maharashtra Kesari 2023: पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनाधिकृत, शरद पवार गटाची घोषणा
Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनाधिकृत ठरवण्याच्या पत्रावर आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी दिलं उत्तर.
संजय दुधाणे
पुणे: प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होणार आहे. येत्या मंगळवारपासून पुण्यात कोथरुडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनाधिकृत असल्याचं पत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने काढलय. त्यामुळे गोंधळ निर्माण झालय. या पत्रावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी भूमिका स्पष्ट केलीय. प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलय.
बाळासाहेब लांडगेंनी काय म्हटलय?
कुस्तीगीर परिषदेच्या नियम व अटी मान्य न केल्याने पुण्यातील स्पर्धा अधिकृत नसल्याचं कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पत्रक काढलं आहे.
स्पर्धेचे आयोजक मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
“महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने जनतेला एक वेगळेपण पहायला मिळणार आहे. 80 हजार प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. एक प्रकारच हे स्टेडियम आहे. मॅट आणि माती या दोन प्रकारात ही स्पर्धा होणार असून 950 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत” अशी माहिती महाराष्ट्र केसरीचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बक्षिसांचा पाऊस
महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्याला 14 लाखाची थार गाडी भेट देण्यात येईल. त्याशिवाय 5 लाखाच बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या स्पर्धकाल अडीच लाख रुपये आणि ट्रॅक्टर बक्षीस म्हणून दिला जाईल. 18 वजनी गटातील प्रत्येक विजेत्याला जावा कंपनीची एसडी गाडी भेट म्हणून दिली जाईल. 45 जिल्ह्यातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धा अनधिकृत ठरवण्याच्या आरोपावर दिलं उत्तर
शरद पवार गटाच्या बाळासाहेब लांडगे यांनी पत्रक काढून महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनधिकृत असल्याच म्हटलय. त्यावर मुरलीधार मोहोळ म्हणाले, की, “स्वत: शरद पवार साहेबांनी सर्वांना बोलवून घेतलं. स्पर्धा निर्विघ्न पार पडली पाहिजे. कुठलही गालबोट लागू नये असं सांगितलय” “एका व्यक्तीने स्वत: पत्रक काढलय. संघटनेतील कोणीही पदाधिकारी त्यांच्या सोबत नाहीय” असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला.
“भारतीय कुस्ती संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र कुस्ती परिषद भ्रष्टाचाराची चौकशी सुरु आहे. त्यात मला जायचं नाही. भारतीय कुस्ती संघाच्या अस्थायी समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुस्ती स्पर्धा चालू आहेत. अस्थायी समितीच्या अध्यक्षांनी पत्र दिलय. त्यामुळे ही स्पर्धा अधिकृत आहे” असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.