करार यादीतून वगळण्याची तमा नाही, धोनी थेट मैदानात उतरला!
बीसीसीआयने वार्षिक कराराच्या यादीतून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) नाव वगळले आहे. मात्र, या गोष्टीचा स्वत:ला त्रास न करुन घेता धोनी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.
रांची : बीसीसीआयने वार्षिक कराराच्या यादीतून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) नाव वगळले आहे. मात्र, या गोष्टीचा स्वत:ला त्रास न करुन घेता धोनी पुन्हा एकदा कामाला लागला आहे. धोनी गुरुवारी झारखंडच्या रांची स्टेडियममध्ये सराव करताना दिसला. धोनीने आगामी आयपीएलची तयारी सुरु केली आहे.
महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) गुरुवारी झारखंड रणजी संघासोबत सराव सुरु होता. याबाबत संघाच्या खेळाडूंना विचारले असता “धोनी आमच्यासोबत सराव करायला येईल, याबाबत आम्हाला माहिती नव्हती. आमच्यासाठी हा एक सुखद धक्का होता. धोनीने थोडा वेळ फलंदाजी केली. आम्हाला आशा आहे की तो वारंवार आमच्या संघासोबत सराव करत राहील. धोनीच्या मार्गदर्शनामुळे चांगला फायदा होईल.” दरम्यान, रांची स्टेडियममध्ये सराव करत असताना झारखंडच्या संघाने लाल चेंडूसोबत तर धोनीने पांढऱ्या रंगाच्या चेंडूसोबत सराव केला.
महेंद्र सिंह धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार?
भारतीय क्रिकेट विश्वातील महेंद्रसिंह धोनी हे एक मोठं नाव आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाला सर्वाधिक प्रमाणात यश मिळालं. धोनीच्या नेतृत्वाने भारताला टी-20 आणि वनडे दोन्ही सामन्यांचा विश्वकप जिंकून दिला. मात्र, आता धोनी निवृत्तीच्या वाटेला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याशिवाय बीसीसीआयने वार्षिक कराराच्या यादीतूनही धोनीचे नाव वगळले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.
महेंद्र सिंह धोनी 9 जुलै 2019 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो सामना विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामना होता. या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. त्यानंतर धोनी मैदानावर खेळताना दिसलाच नाही. धोनीने पुन्हा आंतरराष्ट्रीय सामने खेळावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. धोनीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरी धोनी आंतरराष्ट्रीय टी-20 आणि वनडे सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे, असे हरभजन म्हणाला आहे.