Rohit Sharma : मुंबई क्रिकेट संघटनेकडून रोहित शर्माचा सन्मान वाढवणारा निर्णय
Rohit Sharma : T20 वर्ल्ड कप पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. टीम इंडियाला वर्ल्ड क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनवण्यात रोहित शर्माच महत्त्वाच योगदान आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोशिएशनकडून विशेष सन्मान करण्यात आला आहे. टीम इंडियाने, T20 वर्ल्ड कप पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. टीम इंडियाला वर्ल्ड क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनवण्यात रोहित शर्माच महत्त्वाच योगदान आहे. हीच बाब ध्यानात घेऊन मुंबई क्रिकेट असोशिएशनने रोहित शर्माला सन्मानित केलं आहे. ज्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळून रोहित शर्मा मोठा झाला, त्याच स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाचा स्टँड असणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आता रोहित शर्मा स्टँड असेल.
स्टेडियममधील दिवेचा पॅव्हेलियनच्या एका स्टँडला भारताचा हिटमॅन रोहित शर्माचे नाव देण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) घेतला आहे. त्याचप्रमाणे, स्टेडियममधील अन्य स्टँड्सना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या वार्षिक साधारण बैठकीत ‘एमसीए’ने हे निर्णय घेतले.
शरद पवार यांचे नाव
यानुसार दिवेचा पॅव्हेलियनच्या तिसऱ्या मजल्याच्या स्टँडला रोहितचे नाव देण्यात येणार आहे तसेच, ग्रँड स्टँडच्या तिसऱ्या मजल्याला शरद पवार यांचे, तर चौथ्या मजल्यावरील स्टँडला वाडेकर यांचे नाव देण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर आणि विजय मर्चेंट या दिग्गज खेळाडूंच्या नावाचे स्टँड्स असून आता यामध्ये वाडेकर आणि रोहित यांच्या नावांची भर पडणार आहे.
त्याचप्रमाणे, ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या आठवणीत ‘एमसीए’ पॅव्हेलियनमधील सामना दिवस कार्यालयाचे नाव ‘अमोल काळे यांच्या आठवणीत एमसीए कार्यालय लाऊंज’ असे ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.