टीव्ही 9 नेटवर्क इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस फुटबॉल मोहिमेचं मोठं यश, आर्यवीर पांडे ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाणार
टीव्ही 9 नेटवर्कच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस फुटबॉल मोहिमेचा भाग म्हणून 32 प्रतिभावंत खेळाडूंमध्ये निवड झाल्यानंतर गुरुग्रामचा 12 वर्षीय आर्यवीर पांडे देखील प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रियाला जाणार आहे.

भारताचा फुटबॉल क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. या मोहिमेत टीव्ही 9 नेटवर्क मोलाची साथ देत आहे. भारतातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध आणि त्यांनी निवड करण्याचा वसा हाती घेतला आहे. टीव्ही 9 नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील प्रतिभावंत खेळाडू शोधण्यासाठी इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिम राबविली आहे. या मोहिमेतून ऑस्ट्रियाला प्रशिक्षणासाठी 32 मुलांची निवड केली आहे. यात 12 वर्षांच्या आर्यवीर पांडेचाही समावेश आहे. आर्यवीर हा पोहणे, धावणे आणि तबला वाजवण्यात निपुण आहे. पण या सर्वांपेक्षा फुटबॉल हा त्याच्या आवडीचा खेळ आहे. त्याची खेळी पाहून त्यातली प्रतिभा दिसून आली आहे. आर्यवीर भविष्यात काहीतरी करू शकतो याची जाणीव आतापासून होत आहे. आर्यवीर सुरुवातीला टीव्ही 9 नेटवर्कच्या संपूर्ण भारतातील फुटबॉल टॅलेंट हंट उपक्रमात चाचण्यांसाठी नावनोंदणी केलेल्या 50 हजार मुलांमध्ये होता. या उपक्रमात देशभरातील आठ स्काउटिंग कॅम्पमध्ये 16 हजार शाळांनी भाग घेतला होता. यातून त्याची निवड झाली आहे.
मोहिमेत नाव नोंदवलेल्या 50 हजार मुलांपैकी चांगलं फुटबॉल कौशल्य असलेल्या फक्त 32 मुलांची निवड करण्यात आली. या मुलांकडून फार अपेक्षा असून त्यांना या खेळातील बारकावे शिकता यावेत यासाठी युरोपियन प्रशिक्षकांकडून धडे मिळणार आहे. यासाठी ऑस्ट्रियाला जाणार आहेत. गुरुग्राममधील सलवान पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असलेला आर्यवीरला व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्याची इच्छा आहे. त्याने आधीच त्याच्या परिसरातील एका मैदानावर नियमित प्रशिक्षण घेतले आहे. फुटबॉल तंत्र सुधारण्यावर त्याचं लक्ष आहे आणि त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण घेण्याची त्याची मनापासून इच्छा आहे.
आर्यवीरच्या पालकांनी त्याच्यात शिस्तबद्ध दृष्टिकोन निर्माण केला आहे आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली आवड निर्माण केली आहे. ऑस्ट्रियाचा हा दौरा आर्यवीरच्या फुटबॉल प्रतिभेला चालना देणारा ठरणार आहे. फुटबॉलच्या मैदानात मिडफिल्डर म्हणून त्याची कसब अधोरेखित झाली आहे. त्याच्या नैसर्गिक तांत्रिक क्षमतेमुळे, मैदानावरील दृष्टी, चेंडूवर संयम आणि अथक दृढनिश्चयाने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्यातील प्रतिभा योग्यरित्या जोपासली गेली तर हे सर्व गुण त्याला एक उत्तम मिडफिल्डर नक्कीच करतील. ऑस्ट्रियामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आर्यवीरची निवड झाल्याने खूपच आनंदी झाला आहे. त्याच्या पालकांना आशा आहे की, नक्कीच मोठं पाऊल टाकेल.