फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर देशाचा नावलौकिक होईल : उद्धव ठाकरे
नवी मुंबई येथील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई : येथील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबई, खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022 चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल,खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आदेश बांदेकर,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडको चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
मातीशी नाळ जोडली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.
स्पोर्ट्स सिटीचा उदय
खारघर हे शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी “सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा हिंदुस्थानचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर हिंदुस्तानच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले. नव्या पिढीचा आवडता खेळ फुटबॉलच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या उत्कृष्टता केंद्राच्या व मैदानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वजण मिळून सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. तसेच याच मैदानात लवकरच एएफसी वूमेन एशियन कप इंडिया 2022 चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नव्या पिढीसाठी पर्वणी
पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉल प्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व हिंदुस्थानचे नाव मोठे करतील, असे सांगितले.
व्हिडीओ पाहा
फुटबॉल महाराष्ट्र, सेंटर ऑफ एक्सेलन्स, येथील खेळपट्ट्यांचे मा. @CMOMaharashtra श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते व्हर्चुअल उद्घाटन करण्यात येणार. यामुळे नवी मुंबईची क्रीडा जगतात आगेकूच सुरू होईल.#थेट_प्रक्षेपण | सिडकोचे अधिकृत फेसबुक आणि युट्यूब माध्यम
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) January 16, 2022
इतर बातम्या
ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम