Asian Games : भारताने इतिहास घडवला … आशियाई स्पर्धेत पदकांची शंभरी; किती सूवर्ण पदकं पटकावली?
प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामगिरीचा अमीट आणि असीम ठसा उटवणाऱ्या भारतीयांनी आता आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. गगनाला गवसणी घालणारी अशी कामगिरी भारताने आशियाई स्पर्धेत केली आहे.

नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : भारतासाठी आज सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दिवस आहे. भारताने आशियाई स्पर्धेत एक दोन नव्हे तर तब्बल 100 पदके जिंकली आहेत. एकापाठोपाठ एक पदकं जिंकत भारताने ही जोरदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताने 25 सूवर्ण पदकांचीही लयलूट केली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेत भारताचा दबदबा वाढला आहे. आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट करण्याचं स्वप्न भारताने पाहिलं होतं. भारताचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.
आशिया स्पर्धेचा आज 14 वा दिवस आहे. या 14 दिवसातच भारताने मोठी कामगिरी करत एकूण 100 पदके जिंकली आहेत. यात 25 सूवर्ण, 35 रजत आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या ज्योती वेन्नम हिने तीरंदाजीत गोल्ड मेडल मिळवलं आहे. तर अदिती स्वामीने कंपाऊंड तीरंदाजीत कांस्य पदक जिंकलं आहे. या दोन पदकाच्या बळावर भारताच्या पदकांची संख्या 100 झाली आहे.
आज तीन सूवर्ण पदकांची कमाई
भारताने आज तीन सूवर्ण, एक रजत आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. अदिती स्वामीने कंपाऊंड तीरंदाजीत कांस्य पदक पटकावलं आहे. तर ज्योती वेन्नम आणि ओजस देवताळे यांनी कंपाऊंड तीरंदाजीत प्रत्येकी एक सूवर्णपदक पटकावलं आहे. अभिषेक वर्माने कंपाऊंड तीरंदाजीत रजत पदक मिळवलं आहे. महिला कबड्डी टीमनेही सूवर्ण पदकाची कमाई करून भारताचा तिरंगा फडकवला आहे.
पहिल्यांदाच असं झालं
भारताने पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत 100 पदकांची लूट केली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारतीय खेळाडूंनी 100 पदकं जिंकले आहेत. आपले खेळाडू आज जगात कुणापेक्षाही कमी नाही. कठिण काळात अत्यंत कठोर परिश्रम करून त्यांनी देशाला पदके मिळवून दिली आहेत. आता क्रीडा जगतात भारताचाच बोलबाला राहील असा काळ लवकरच येईल, असं ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.
कबड्डीत सूवर्ण पदक
भारतीय महिला कबड्डीपटूंनी अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. कबड्डीच्या अंतिम सामन्यात चीनी ताईपेला 26-24 ने मात देत भारताने सूवर्ण पदक कमावलं आहे. भारतासाठी हे ऐतिहासिक सूवर्ण पदक आहे. या सूवर्ण पदकाबरोबरच भारताची आशिया स्पर्धेतील सूवर्ण पदकांची संख्या 25 झाली आहे.