Copa America Final : स्पर्धा परदेशात ईर्षा कोल्हापुरात, मेस्सीच्या अर्जेंटीना संघाचा विजय कोल्हापुरात साजरा
कोपा अमेरिका चषक 2021 मध्ये फायनलचा सामना जगातील अव्वल क्रमाकांचे खेळाडू मेस्सी आणि नेयमार याच्या अर्जेंटीना विरुद्ध ब्राझील संघात रंगला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अर्जेंटीना संघाने विजय तिकडे ब्राझीलमध्ये मिळवला आणि त्याचा उत्साह इकडे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरात दिसून आला.
कोल्हापूर : संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) रविवारी पहाटे पार पडला. अर्जेंटीना संघाने ब्राझीलवर (Argentina vs Brazil) 1-0 च्या फरकाने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला. या विजायनंतर अर्जेंटीना संघाने मैदानात तुफान जल्लोष केला. साहजिकच अर्जेंटीना देशातही तेथील नागरिकांनी विजयाचे सेलेब्रेशन केले असेल. पण विशेष म्हणजे ब्राझीलमध्ये पार पडलेल्या या सामन्यात अर्जेंटीनाचा विजय तब्बल 14 हजार किमी दूर महाराष्ट्रातील कोल्हापुरातही साजरा करण्यात आला. पूर्वीपासून फुटबॉलप्रेमींसाठी ओळखले जाणारे कोल्हापूर शहर आज पुन्हा चर्चेत आले. ते म्हणजे कोपा अमेरिकेत जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या (Lionel Messi) अर्जेंटीना संघाने विजय मिळवल्यानंतर आनंदोत्सव साजरा केल्यामुळे…(Kolhapur Boys Celebrates Messis Argentina Win in Copa America Final Against Brazil)
कोल्हापूर हे देशातील असे शहर आहे ज्याठिकाणी क्रिकेटपेक्षा अधिक फुटबॉल खेळले जाते. शहरात बरीच अशी मित्रमंडळं देखील आहेत ज्यांचे स्वत:चे फुटबॉल संघ असून या संघामध्ये संपूर्ण नियोजनबद्ध सामने खेळवले जातात. वर्षभरात अशा काही मह्त्त्वाच्या स्पर्धा खेळवल्या जातात. ज्यात महासंग्राम चषक हा सर्वात मानाचा आणि महत्त्वाचा असतो. तर अशा या फुटबॉलप्रेमी शहरात असणाऱ्या विविध मंडळाच्याही आपल्या आवडच्या फुटबॉल टीम्स आहेत. त्यांच्या संघाच्या जर्सीही त्याच संघाच्या रंगाच्या आहेत. तर अशाचप्रकारे अर्जेंटिना संघाचे कट्टर समर्थक असणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाने कोपा चषकात अर्जेंटीनाच्या विजयानंतर मोठा जल्लोष केला. यावेळी दुसरीकडे ब्राझीलचे समर्थक असणाऱ्या पाटाकडील तालीम मंडळात मात्र लाडका संघ पराभूत झाल्याने निराशा दिसून आली. तर याच फुटबॉलप्रेमींचा जल्लोष करतानचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून तुम्ही हा व्हिडीओ पाहाच..
चुरशीच्या सामन्यात अर्जेंटीना विजयी
नेमार आणि मेस्सी सोडता दोन्ही संघाकडे उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा होता. ज्यात ब्राझीलकडे थियागो सिल्वा, फ्रेड, कॅसमिरोसारखे खेळाडू होते. तर अर्जेंटीनाकडे मेस्सीसह डी मारीया, पॅरडेज, लुईस मार्टीनेजसारखे तगडे खेळाडू होते. त्यामुळे या सामन्याकडे सर्वच फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून होते. सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा सुरू होता. दोन्ही संघ एकमेकांना तोडीस तो़ खेळ करत होते. अखेर २२ व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या एंजल डी. मारिया (Angel DI maria) याने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ब्राझीलला एकही गोल करता न आल्याने अखेर सामना 1-0 च्या फरकाने अर्जेंटीनाने जिंकत स्पर्धाही आपल्या नावे केली.
हे ही वाचा :
Copa America Final Winner : विजयानंतर अर्जेंटीना संघाचा जल्लोष, मेस्सीला अश्रू अनावर, पाहा फोटो
(Kolhapur Boys Celebrates Messis Argentina Win in Copa America Final Against Brazil)