मुंबई : आर. माधवन(R Madhavan)चा मुलगा वेदांत (Vedaant) यानं 2026च्या ऑलिम्पिक(Olympics)ची तयारी सुरू केलीय. मात्र, सध्या देशात सुविधांचा अभाव असल्यानं तो आपली पत्नी सरितासह आपल्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी दुबई(Dubai)ला गेलाय. वेदांत एक राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू (National Swimming Champion) आहे.
‘पुरेशा सुविधा मिळायला हव्या’
माधवन आणि त्याच्या पत्नीची इच्छा होती, की त्यानं सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेची तयारी करत असताना त्याला सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात. माधवननं एका मुलाखतीत सांगितलं, की आमचं कुटुंब दुबईमध्ये आहे जेणेकरून त्याच्या मुलाला मोठ्या तरणतलावामध्ये प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीनं प्रवेश मिळावा.
‘आम्ही त्याच्या पाठीशी’
मुंबईतले मोठे जलतरण तलाव एकतर कोविडमुळे बंद आहेत. जे आहेत तेही खूप अंतरावर आहेत. आम्ही इथं दुबईमध्ये वेदांतसोबत आहोत. इथं त्याला मोठ्या तलावांमध्ये प्रवेश आहे. तो ऑलिम्पिकची तयारी करतोय. मी आणि सरिता (त्याची पत्नी) त्याच्या पाठीशी आहोत, असं माधवन म्हणाला.
‘माझ्या करिअरपेक्षा हे महत्त्वाचं’
मुलाच्या भविष्याविषयी तो म्हणाला, की पालक या नात्यानं त्याला ज्यामध्ये आवड आहे, ते क्षेत्र निवडावं. पालक म्हणून आम्ही त्याचासोबत आहोत. तो वेगवेगळ्या स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकतोय. आम्हाला खूप अभिमान वाटू लागलाय. त्यानं अभिनयाचं क्षेत्र नाकारलं, याबद्दल मला कोणतंही दु:ख नाही. त्यानं निवडलेलं क्षेत्र माझ्या करिअरपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं मी मानतो. मुलांवर दबाव टाकून त्यांच्या करिअरला आकार देता येणार नाही. त्यामुळे अभिनयापेक्षा त्याला खेळात अधिक रस असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही पालक म्हणून त्याला पूर्ण पाठिंबा दिला. आता ऑलिम्पिकच्या दृष्टीनं जे काही आवश्यक असेल, त्या सर्व सुविधा पुरवण्याकडे लक्ष देऊ, असं त्यानं सांगितलं.