मेलबर्न: भारताची पहिली महिला टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाने (Sania Mirza) तिच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. 2022 माझा शेवटचा सीजन असेल, असे सानियाने म्हटले आहे. सानियाने सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. WTA च्या सिंगल रँकिंगमध्ये पहिल्या तीसमध्ये पोहोचलेली सानिया पहिली भारतीय आहे. सानिया मिर्झाने टेनिस खेळताना दुहेरीत उल्लेखनीय यश मिळवलं.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या सलामीच्या लढतीतच पराभव झाल्यानंतर सानियाने तिच्या निवृत्तीच्या प्लानची घोषणा केली.
सानिया काय म्हणाली…
“मी निवृत्तीचा निर्णय घेतला, त्यामागे काही कारण आहेत. मला तंदुरुस्तीसाठी वेळ लागतोय. मी माझ्या तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन फिरताना त्याला जीव धोक्यात घालतेय, हे मला लक्षात घेतलं पाहिजे. मला माझं शरीर साथ देत नाहीय. माझे गुडघे आज दुखत होते. त्यामुळे पराभव झाला, असे मी म्हणणार नाही. वय वाढत चाललय तसं पूर्णपणे फिट व्हायलाही वेळ लागतोय” असं सानियाने सांगितलं.
“नेहमी मी स्वत:ला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करते. पहिल्यासारखी ऊर्जा राहिलेली नाही. मला आनंद मिळतोय, तो पर्यंत मी खेळणार असे मी म्हणते पण त्या प्रक्रियेमध्ये मी पूर्वीसारखा खेळाचा आनंद घेतेय, असे मला वाटत नाही” असे सानियाने म्हटले आहे.
“मला आनंद मिळतोय, म्हणून मी हा सीझन खेळीन. मला खेळायचं सुद्धा आहे. पण आणखी वर्षभर खेळीन. पुनरागमनासाठी मी बरीच मेहनत केलीय. वजन कमी केलय, फिटनेसवर मेहनत घेतलीय. दुसऱ्या मातांसमोर चांगले उदहारण ठेवले आहे. नव्या मातांनी त्यांचं स्वप्न शक्य तितकं पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या सीजननंतर शरीर साथ देईल असं वाटत नाही” असं सानियाने म्हटलं आहे.