“जडेजा आणि अश्विन दोघंही मला…”, मैदानात कर्णधारपद भूषविताना रोहित शर्मावर आलं असं दडपण
India Vs Australia 1st Test: पहिल्या कसोटी सामना भारतीय फिरकीपटूंनी गाजवला. पहिल्या डावात रविंद्र जडेजाने 5 , तर दुसऱ्या डावात आर. अश्विननं बळी टिपले. मात्र असं असूनही दोघांच्या गोलंदाजीने कर्णधार रोहित शर्माला टेन्शन आलं होतं.
मुंबई- बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात फिरकीपटूंचं वर्चस्व दिसून आलं. भारताकडून रविंद्र जडेजा आणि अश्विन, तर ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीनं फलंदाजांना नाचवलं. पण ऑस्ट्रेलियाचे तुलनेत भारतीय फलंदाज खेळपट्टीवर उजवे ठरले. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 177 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने प्रत्युत्तरात 400 धावा केल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली. मात्र ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 91 या धावांवर बाद झाला. भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात विजयाचे मानकरी ठरलेले रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन कर्णधार रोहित शर्मासाठी डोकेदुखी ठरले.तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. कारण याबाबतचा खुलासा खुद्द कर्णधार रोहित शर्मानं केला आहे. त्याने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारतीय संघात आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षऱ पटेल असे तीन फिरकीपटू होते. तिघंही संघातील उत्तम फिरकीपटू आहेत.”मला तीन फिरकीपटूंना हाताळायचं होतं. जडेजा यायचा आणि सांगायचं मला बॉलिंग दे मला एक विकेट हवी 250 पूर्ण करण्यासाठी, तर अश्विन यायचा आणि सांगायचा मला गोलंदाजी दे मला पाच विकेट पूर्ण करायचे आहेत. त्यावेळी मैदानात माझी गोची व्हायची. त्यांच्या रेकॉर्डबाबत मला तितकं माहिती नव्हतं. पण असं असलं तरी ते उत्तम गोलंदाज आहेत तेही तितकंच खरं. त्यामुळे चेंडू सोपवताना माझ्यावर दडपण यायचं.”, असं रोहित शर्मानं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
पहिल्या डावात रविंद्र जडेजाने 22 षटकात 8 षटकं निर्धाव टाकत 47 धावा दिल्या आणि 5 गडी बाद केले. तर आर. अश्विननं 15.5 षटकात 2 षटकं निर्धाव टाकत 42 धावा देत 3 गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने 12 षटकात 3 निर्धाव षटकं टाकत 34 धावा देत 2 गडी टिपले. तर आर. अश्विननं 12 षटकात 3 निर्धाव षटकं टाकत 37 धावांवर 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला.
बॉर्डर गावसकर कसोटी स्पर्धा
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरा कसोटी सामना) – दिल्ली, भारत, 17-21 फेब्रुवारी
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा कसोटी सामना) – धर्मशाला, भारत, 1-5 मार्च
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.