दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सोमवारी (28 सप्टेंबर) रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामान्यात सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा पराभव झाला. मात्र, तरीदेखील मुंबईचा फलंदाज इशान किशन याने त्याच्या सुपरफास्ट फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. इशानने 58 चेंडूत 99 धावा केल्या. यामध्ये 9 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे (Rohit Sharma on Ishan Kishan performance).
इशानच्या जबरदस्त खेळीमुळेच सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. पण सुपर ओव्हरमध्ये त्याने फलंदाजी केली नाही. त्यामुळे मुंबईचा डाव सावरणाऱ्या इशानला सुपर ओव्हरमध्ये का पाठवलं नाही? असा प्रश्न मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला सामना संपल्यानंतर विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना रोहितने इशानच्या फलंदाजीचं कौतुक केलं. मात्र, तो थकला असल्याने त्याच्याजागी हार्दिक पांड्याला पाठवण्याचा निर्णय घेतला, असं रोहितने सांगितलं.
“हार्दिक धडाकेबाज फलंदाज आहे. तो लांब शॉट मारु शकतो. त्यामुळे त्याच्यावर विश्वास होता. मात्र, हवं तसं झालं नाही. काही वेळा नशिबानेदेखील साथ द्यायला हवी”, असं रोहित शर्मा म्हणाला (Rohit Sharma on Ishan Kishan performance).
पाचव्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी
दरम्यान, मुंबईचे फलंदाज इशान किशन आणि किरन पोलार्ड यांनी पाचव्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. मात्र, शेवटच्या षटकाच्या पाचव्या बॉलवर इशान झेलबाद झाला. त्यावेळी मुंबईला विजयासाठी 2 चेंडूत 5 धावांची आवश्यकता होती. मात्र, उंच फटका मारण्याच्या नादात इशान झेलबाद झाला. त्यानंतर शेवटच्या बॉलवर पोलार्डने चौकार ठोकला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून किरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदनावर उतरले. मात्र, बंगळुरुचा फलंदाज नवदीप सैनीच्या बोलिंगसमोर त्यांना फलंदाजी करता आली नाही. सैनीच्या पाचव्या बॉलवर पोलार्ड झेलबाद झाला. अखेर मुंबईकडून 8 धावांचं आव्हान बंगळुरुला देण्यात आलं. हे आव्हान बंगळुरुने सहज पूर्ण केलं.
संबंधित बातमी :
सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात