पुणे : महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) अंतिम सामना आज पार पडला. या सामन्यात पैलवान शिवराज राक्षे (Nanded Shivraj Rakshe) याने बाजी मारलीय. अंतिम सामना हा थरारक झाला. खरंतर आजचे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने अटीतटीचे झाले. त्यानंतर शेवटच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याने अवघ्या 40 व्या सेकंदात पुण्याचा पैलवान महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) चितपट केलं. या अंतिम सामन्यातून राज्याला 65 वा महाराष्ट्र केसरी मिळाला. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर शिवराजने प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने आपल्या आई-वडिलांची आठवण काढली. आपल्या आई-वडिलांना याक्षणी खूप आनंद झाला असेल. ते हा सामना पाहत असतील, असं शिवराज म्हणाला. यावेळी शिवराजने आपल्या कुटुंबासह मित्र परिवाराचेदेखील आभार मानले.
“मी गेल्या 12 वर्षांपासून तपश्चर्या करत होतो. आता मला त्याचं फळ मिळालं आहे. मध्यंतरी मला दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्यावर्षी मला स्पर्धेत सहभागी होता आलं नव्हतं. माझं ऑलिम्पिक टार्गेट आहे. माझ्या आई-वडिलांना खूप आनंद झाला असेल. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं”, अशी पहिला प्रतिक्रिया शिवराज राक्षेने दिली.
शिवराज राक्षेच्या विजयावर त्याच्या वडिलांनीदेखील आनंद व्यक्त केलाय. शिवराजच्या वडिलांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
“शिवराजने आमचं स्वप्न साकार केलं. चांगलं वाटतंय. तालुक्याच्या, गावच्या लोकांचं त्याच्यावर प्रेम होतं. त्याने गदा मिळवावी अशी सगळ्यांची इच्छा होती. शिवराजच्या मोठ्या भावानेदेखील त्याच्यासाठी खूप कष्ट केले. छोट्या भावानेही काळजी घेतली”, अशी पहिली प्रतिक्रिया शिवराजच्या वडिलांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी खेळाडूंसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
“महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच मेडल मिळवणार. आपल्या राज्यात खेळाडूंना 2 वर्षांपासून मानधन मिळत नाहीय. जे 6 हजार मानधन मिळत होते ते आता 20 हजार करणार”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार मानधन आहे ते आता साडे सात हजार करु”, अशीदेखील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुरु केला.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस फक्त यावरच थांबले नाहीत. त्यांनी महाराष्ट्र केसरी विजेता स्पर्धकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली. महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.