शोएब मलिकचे कारनामे बहिणीकडूनच उघड; सानियाला सत्य समजलं म्हणूनच..
टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटामागचं कारण त्याच्या बहिणीने सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने भावाच्या तिसऱ्या लग्नाला अनुपस्थित राहिल्याचाही खुलासा केला. शोएबने सना जावेदशी तिसरं लग्न केलंय.

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक ही जोडी एकेकाळी क्रीडा विश्वात अत्यंत लोकप्रिय होती. परंतु 2022 पासून या दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली. अखेर जेव्हा अचानक शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. सानियाने खुला दिल्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोएबच्या बहिणीने धक्कादायक खुलासा केला आहे. सानिया आणि शोएब का विभक्त झाले, यामागचं कारण तिने सांगितलं आहे.
‘पाकिस्तान डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, शोएबच्या तिसऱ्या निकाहला त्याची बहीण उपस्थित नव्हती. एका मुलाखतीत तिने सानिया आणि शोएब हे दोघं का वेगळे झाले असावेत, यामागचं कारण सांगितलं आहे. घटस्फोटाच्या कारणाबाबत सानिया आणि तिच्या कुटुंबीयांनाही अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. “सानिया त्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैतागली होती”, असं धक्कादायक वक्तव्य शोएबच्या बहिणीने केलंय. यामुळेच संपूर्ण कुटुंबाने शोएबच्या तिसऱ्या निकाहला न जाण्याचं ठरवलं होतं, असाही खुलासा तिने केला.




View this post on Instagram
याआधी जेव्हा शोएबने तिसरं लग्न जाहीर केलं, तेव्हा सानियाची बहीण अनम हिने जानेवारी 2024 मध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली होती. सानियाने खुला घेतल्याचं तिने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं होतं. खुला ही इस्लामिक कायद्यातील एक प्रक्रिया आहे, जी मुस्लीम महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याची परवानगी देते. “सानियाने काही महिन्यांपूर्वी शोएब मलिककडून खुला घेतला आहे. त्याच्या नवीन प्रवासासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो”, अशी पोस्ट अनमने लिहिली होती.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांना एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर मुलाचं पालकत्व सानियाला मिळालं आहे. शोएबने 2002 मध्ये आयेशा सिद्दिकीशी पहिलं लग्न केलं होतं. 7 एप्रिल 2010 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याचं नाव अभिनेत्री सायली भगतशी जोडलं गेलं होतं. मात्र अफेअरच्या या चर्चा फेटाळत शोएबने सानियाशी लग्नगाठ बांधली. हैदराबादी मुस्लीम विवाहपद्धतीनुसार या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. जगभरातील मीडियाने हा लग्नसोहळा कव्हर केला होता. त्यानंतर 2018 मध्ये सानियाने मुलाला जन्म दिला. आता शोएबने सना जावेदशी तिसरं लग्न केलं आहे.