पहिल्याच वनडेमध्ये सचिनसोबत घडलेली ‘ती’ गोष्ट, तो कधीच विसरु शकत नाही!
वनडे करीअरची अशी सुरुवात झाल्यानंतर सचिन धावांच्या राशी उभारेल, इतके विक्रम आपल्या नावावर करेल, अशी कल्पना केली नसती. पण सराव, मेहनत आणि सातत्य याच्या बळावर सचिन यशोशिखर गाठता येऊ शकतं, हे दाखवून दिलं.
नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एक मोठं नाव आहे. आकडेच सचिन तेंडुलकरबद्दल सर्वकाही सांगून जातात. सचिन आता निवृत्तीचे जीवन जगत असला, तरी त्याचं क्रिकेटबद्दलच मार्गदर्शन, सल्ला, मत आजही क्रिकेटप्रेमी प्रमाण मानतात. कारण सचिनचा अनुभव, कौशल्य आणि अभ्यासच तितका मोठा आहे. सर्वसामान्य क्रिकेटचाहत्याला सचिन भेटल्यानंतर जसा, देवाला भेटल्याचा आनंद होतो, तसं युवा क्रिकेटपटूंसाठी सचिन एक विद्यापीठ आहे. त्याचं मार्गदर्शन, मोलाचा सल्ला एखाद्याचं करीअर घडवू शकतो. म्हणूनच युवा क्रिकेटपटू सचिनला भेटण्यासाठी नेहमी उत्सुक्त असतात.
सचिन एक यशस्वी क्रिकेटपटू असला, तरी त्याच्या वनडे करीअरची सुरुवात पाहिली, तर सचिन क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचेल, अशी कल्पनाही कोणी त्यावेळी केली नसती. 1989 साली पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतून सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आज सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? वनडेमधील पहिलं शतक झळकवण्यासाठी सचिनला तब्बल 79 सामने खेळावे लागले. 1994 साली कोलंबोमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने पहिले शतक झळकावले. त्यानंतर सचिनने कधी मागे वळून बघितलं नाही. धावांच्या राशी उभारल्या.
कोवळ्या सचिनचं काय होणार, असंच सर्वांना वाटलं 1989 साली भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यावर जाण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष राजसिंह डुंगरपूर यांनी संघ घोषित केला. या संघामध्ये एका नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ते नाव होतं, सचिन तेंडुलकरचं. कारण सचिन त्यावेळी अवघा 16 वर्षांचा होता. वकार युनूस, वसिम अक्रम, अब्दुल कादीर यांच्यासमोर कोवळ्या सचिनचा काय निभाव लागणार? असंच सर्वांना त्यावेळी वाटलं होतं. पण या दौऱ्यात जे घडलं, तो इतिहास आहे.
पहिल्या वनडेमध्ये सचिन सोबत काय झालं? कसोटी मालिकेनंतर वनडे सीरीजला सुरुवात झाली. 16 डिसेंबरला पहिला वनडे सामना होता. पण पाऊस आणि कमी प्रकाशमानामुळे हा सामना रद्द झाला. 18 डिसेंबरला दुसरा सामना होता. पण पावसाने या सामन्यातही व्यत्यय आणला होता. काही वेळाने सुर्यप्रकाश आल्यानंतर पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली व सामना 50 ऐवजी 16-16 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 16 षटकात 87 धावा केल्या. पाकिस्तानकडून सईद अन्वरने 32 चेंडूत सर्वाधिक 42 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 88 धावांचे लक्ष्य होते. कर्णधार श्रीकांत आणि रमण लांबाची जोडी मैदानात आली. श्रीकांतला या संपूर्ण मालिकेत वसिम अक्रमने बराच त्रास दिला होता. अक्रमची गोलंदाजी खेळणेच श्रीकांतला जमत नव्हतं. या सामन्यातही श्रीकांतला 17 धावांवर वकारने क्लीन बोल्ड केलं. धावफलकावर 34 धावा असताना नवज्योतसिंग सिद्धू आणि रमण लांबा तंबूत परतले होते. त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीनला साथ देण्यासाठी सचिन तेंडुलकर मैदानात उतरला. सचिनकडून सर्वांना भरपूर अपेक्षा होत्या. कारण सचिनने सिद्धूसोबत मिळून सियालकोट कसोटी ड्रॉ केली होती.
सचिन खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आला पण प्रेक्षकांचा लवकरच भ्रमनिरास झाला. अवघ्या दोन चेंडूत वकार-वसिम जोडीने सचिनचा खेळ खल्लास केला. वकारच्या इनस्विंगरवर सचिन फटका खेळला, पण चेंडू सीमारेषेऐवजी थेट अक्रमच्या हातात जाऊन विसावला. प्रेक्षकांची निराशा झाली, सचिन आल्यापावली पॅव्हेलियनच्या दिशेने माघारी फिरला. हा सामना पाकिस्तानने जिंकला.
वनडे करीअरची अशी सुरुवात झाल्यानंतर सचिन धावांच्या राशी उभारेल, इतके विक्रम आपल्या नावावर करेल, अशी कल्पना केली नसती. पण सराव, मेहनत आणि सातत्य याच्या बळावर यशोशिखर गाठता येऊ शकतं, हे सचिनने दाखवून दिलं.
संबंधित बातम्या :
Ind vs SA: रोहितच्या जागी उपकर्णधार कोण? प्रश्नाचं उत्तर मिळालं, ‘या’ खेळाडूवर सोपवली जबाबदारी IND vs SA: द्रविड-विराटच्या टीममध्ये झाला जोरदार सामना, दक्षिण आफ्रिकेत दिसला ‘चक दे इंडिया’चा सीन न्यूझीलंडच्या 34 वर्षाच्या गोलंदाजाचा कहर, प्रतिस्पर्धी संघाची सपशेल शरणागती