Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
मुंबई : आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India tour of Australia) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या तीनही मालिकांसाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र संघाची घोषणा करण्यात आली नव्हती.
विराट कोहली टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आली आहे. यामध्ये नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती या सारख्या युवा खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान दिले आहे. मात्र या संघात मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक जण निवड समितीवर नाराज आहेत.
सूर्यकुमार यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्याची संघात निवड न होणे हा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढतोय. तरीसुद्धा निवड समिती त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीदेखील त्याची निवड झाली नसल्यामुळे अनेक जणांना आश्चर्य वाटत आहे.
टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहदेखील (Harbhajan Singh) बीसीसीआयवर नाराज आहे. त्याने त्याची नाराजी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. हरभजनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय संघात निवड व्हावी, यासाठी सूर्यकुमार यादवने अजून काय करायला हवं? दर वर्षी आयपीएल आणि रणजीमध्ये तो उत्कृष्ट प्रदर्शन करतोय. मला असं वाटतं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे नियम आहेत. या ट्विटमध्ये भज्जीने बीसीसीआयला टॅग करत निवड समितीला सूर्यकुमार यादवचे रेकॉर्ड्स पाहायला सांगितले आहे.
Don’t know what else @surya_14kumar needs to do get picked in the team india.. he has been performing every ipl and Ranji season..different people different rules I guess @BCCI I request all the selectors to see his records
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 27, 2020
बंगाल रणजी संघातील दिग्गज खेळाडू मनोज तिवारीदेखील निवड समितीवर नराज आहे. भारतीय संघात सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल या दोघांना स्थान न दिल्याने तिवारीने त्याची नाराजी व्यक्त केली आहे. तिवारीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काही वर्षांनंतर लोक म्हणतील की, तुम्ही चुकीच्या वेळी जन्माला आलात.
Hard luck @akshar2026 and @surya_14kumar on not making it to the indian team dis time. Some years down d line, few cosy group of people will say that u both were born/played at d wrong Era but i would say u cud have easily played along side ur competitors ?
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) October 26, 2020
सूर्यकुमारने मागील दोन वर्षांप्रमाणे यावर्षीदेखील मुंबई इंडियन्स संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. “सूर्यकुमार यादव पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये भारतीय संघात दिसेल”, अशी भविष्यवाणी माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोप्रा याने केली काही दिवसांपूर्वी केली होती. सूर्यकुमारची आयपीएलमधील फलंदाजी पाहून आकाश चोप्राने त्याचं मत व्यक्त केलं आहे. आकाश चोप्राने म्हटले होते की, या वर्षीच्या शेवटपर्यंत सूर्यकुमार यादव भारतीय संघात दिसू शकतो.
आयपीएलमध्ये दबदबा
सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना 11 सामन्यांमध्ये 31.44 च्या सरासरीने 283 धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने 38 चौकार आणि 5 षटकार ठोकले आहेत. या धावा त्याने 148.94 च्या स्ट्राईक रेटने जमवल्या आहेत. 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलच्या मागील मोसमात सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही सूर्य तळपला
30 वर्षीय सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्येदेखील (Domestic cricket) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. 77 प्रथम श्रेणी सामन्यांमद्ये त्याने 44 पेक्षा जास्त सरासरीने 5326 धावा फटकावल्या आहेत. यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 93 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 35.46 च्या सरासरीने 2447 धावा फटकावल्या आहेत. यात 2 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आहे. 156 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 31.81 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 3245 धावा फटकावल्या आहेत.
संबंधित बातम्या
India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर
IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा
ऋषभ पंतच्या लठ्ठपणाबाबत राहुल द्रविडचं BCCI ला पत्र, इशांत शर्माच्या फिटनेसबाबतही चिंता
(Suryakumar Yadav once again ignored by the selection committee; Harbhajan singh and Manoj Tiwari unhappy with BCCI)