Rohit Sharma : सिडनी कसोटीत रोहित शर्मा स्वत: बाहेर बसला की, त्याला बसवलं, अखेर त्यानेच दिलं उत्तर
Rohit Sharma : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यात आता भारतीय क्रिकेट संघ सिडनी कसोटीत कॅप्टनशिवाय मैदानात उतरला आहे. रोहित शर्मा या टेस्ट मॅचमध्ये स्वत: बाहेर बसला की, त्याला बाहेर बसवलं? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आता स्वत: रोहित शर्माने या प्रश्नाच उत्तर दिलं आहे.
बॉर्डर-गावस्कर सीरीजचा पाचवा कसोटी सामना सिडनी येथे सुरु आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाला या कसोटीत विजय मिळवणं आवश्यक आहे. महत्त्वाच म्हणजे सिडनी कसोटी टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्माशिवाय खेळत आहे. कॅप्टनलाच टीमच्या बाहेर बसवणं ही खूप मोठी बाब आहे. सिडनी कसोटीआधी टीम इंडियात वादाचे बरेच फटाके फुटले आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा व्यक्त झाला आहे. त्याने आपलं मौन सोडलं आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पूर्णपणे फ्लॉप आहे. मॅनेजमेंटला रोहित टेस्ट टीममध्ये नकोय. हा त्याच्या करिअरचा शेवटचा सामना आहे अशा बातम्या सुरु आहेत.
या सगळ्यामध्ये मोठा प्रश्न हा आहे की, रोहितला सिडनी टेस्टसाठी टीममधून डच्चू दिलाय की, तो स्वत: बाहेर बसलाय? रोहित शर्माने आता स्वत: या प्रश्नाच उत्तर दिलं आहे. रोहित शर्माने सिडनी टेस्टच्या दुसऱ्यादिवशी लंचचा स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. “सिडनी टेस्ट न खेळण्याचा माझा निर्णय आहे. मी स्वत: बाहेर बसलोय. माझी बॅट चालत नाहीय. माझ्याकडून धावा होत नाहीयत, म्हणून मी बाहेर बसतोय हे मी निवडकर्ते आणि कोचला सांगितलं. मी दोन मुलांचा पिता आहे. मला समज आहे, मी परिपक्व आहे. मला माहियीत कधी काय करायचं. टीममधल्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूने इतकी महत्त्वपूर्ण मॅच खेळू नये. म्हणून मीच बाहेर बसण्याचा निर्णय घेतलाय” असं रोहित शर्माने सांगितलं.
रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियामध्ये परफॉर्मन्स काय आहे?
रोहित शर्माचा या टेस्ट सीरीजमध्ये धावांसाठी संघर्ष सुरु आहे. या टेस्ट सीरीजमधील आतापर्यंत तीन सामन्यात त्याने 3, 6, 10, 2 आणि 9 धावा केल्या आहेत. भारतीय कॅप्टनने 5 डावात 6.20 च्या सरासरीने एकूण 31 धावा केल्या आहेत. याआधी बांग्लादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. मागच्या आठ कसोटी सामन्यात तो फक्त एक अर्धशतक झळकवू शकला आहे. त्यामुळे त्याने या महत्त्वाच्या सामन्यात बाहेर बसण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन त्याच्याजागी चांगल्या खेळाडूला संधी मिळेल. टीम इंडियाला मालिका बरोबरीत सोडवायची आहे.