IPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड
हा पहिला सामना तब्बल 20 कोटी प्रेक्षकांनी पाहिला.| (Bcci Secretary Jay Shah Tweet About IPL 2020 Opening Match)
अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील पहिला सामना 19 सप्टेंबरला खेळला गेला. हा पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने मुंबईवर 5 विकेटने विजय मिळवला. आयपीएलच्या या पहिल्या सामन्यात एक रेकॉर्डब्रेक झाला आहे. 13 व्या हंगामातील हा पहिला सामना तब्बल 20 कोटी प्रेक्षकांनी पाहिला. यासह हा एक नवा रेकॉर्डब्रेक ठरला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (Bcci Secretary Jai Shah) यांनी ट्विटद्वारे दिली. (Bcci Secretary Jay Shah Tweet About IPL 2020 Opening Match )
जय शाहने ट्विटमध्ये काय म्हटलंय ?
आयपीएलच्या 13 व्या मोसमातील पहिल्या मॅचने नवा विक्रम केला आहे. बीएआरसीच्या (BARC) आकडेवारीनुसार मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील हा सामना तब्बल 20 कोटी लोकांनी पाहिला. आतापर्यंत कोणत्याही देशामधील क्रीडा स्पर्धा इतक्या लोकांनी पाहिली नाही. म्हणजेच कोणत्याही स्पर्धेच्या सुरुवातीच्या पहिल्याच सामन्याला आतापर्यंत इतका मोठ्या प्रमाणात तुफान प्रतिसाद मिळाला नव्हता, अशी माहिती जय शाह यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली.
Opening match of #Dream11IPL sets a new record!
As per BARC, an unprecedented 20crore people tuned in to watch the match. Highest ever opening day viewership for any sporting league in any country- no league has ever opened as big as this. @IPL @SGanguly99 @UShanx @DisneyPlusHS
— Jay Shah (@JayShah) September 22, 2020
कोरोना विषाणमुळे यावेळेस प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाही. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहते आपल्या टीव्हीवरुनच आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा आनंद घेत आहेत.
कर्णधार धोनीचा विक्रम
सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर विजय मिळवला. चेन्नईने हा विजय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मिळवला. याविजयासह धोनीच्या नावावर विक्रमाची नोंद झाली. मुंबई विरोधातील हा विजय धोनीच्या नेतृत्वातील 100 वा विजय ठरला. म्हणजेच चेन्नई संघाला धोनीने आपल्या नेतृत्वाखाली मिळवून दिलेला हा 100 विजय ठरला. आयपीएलच्या इतिहासात धोनीने आतापर्यंत चेन्नई आणि पुणे या दोन संघासाठी नेतृत्व केलं आहे.
कोरोना परिस्थितीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेचं यूएईमध्ये नियोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण 53 दिवस चालणार आहे. तसेच एकूण 60 साखळी सामने खेळले जाणार आहेत.