Tokyo Olympics मधील भारताच्या बॉक्सरला गंभीर दुखापत, तीन महिन्यांपर्यंत विश्रांती अनिवार्य
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताकडून बऱ्याच महिला आणि पुरुष बॉक्सर्सनी सहभाग घेतला होता. पण या सर्वांमध्ये केवळ महिला बॉक्सर लवलीनालाच पदक पटकावता आले.
नवी दिल्ली : यंदा ऑलिम्पिक मध्ये भारताने सात पदकं मिळवली. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या असली तरी आणखी बरेच खेळाडू जे पदकाचे दावेदार होते ते थोडक्यात पदकापासून हुकले. यातीलच एक नाव म्हणजे बॉक्सर विकास कृष्ण (Vikas krishan). टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच राउंडमध्य़े विकास पराभूत झाला. वेल्टरवेट सामन्यात 69 किलो वजनी गटात त्याला जपानच्या ओकाजावा क्विंसी मेंसाहने मात दिली. त्याने विकासला राउंड ऑफ 32 मध्ये सहज पराभूत करत 5-0 ने विजय मिळवला. निराशाजनक पराभवानंतर विकासच्या खांद्यालाही गंभीर दुखापत झाली असून तो तीन महिने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरु शकणार नाही.
विकास यंदा तिसऱ्यांदा ऑलिम्पिक खेळांसाठी भारताकडून खेळत होता. पण यंदाही त्याला पदक पटकावण्यात यश आलं नाही. याआधी लंडन ऑलिम्पिक 2012, रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये त्याने भारताचं प्रतिनिधीत्त्व केलं होतं. यंदाही त्याला पदक मिळवून देण्यासाठीचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण पहिल्या फेरीतच तो स्पर्धेबाहेर गेल्याने सर्वांच्या आशा निराशेत बदलल्या.
तीन महिन्यापर्यंत खेळापासून दूर
ऑलिम्पिकमधील पदकाचं स्वप्न तुटल्यानंतर आता कृष्णाला दुखापतीमुळे तीन महिने बॉक्सिंगही करता येणार नाही. विकासच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याचा उजवा खांदा ‘डिस्लोकेट’ झाल्याने ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात प्रसिद्ध सर्जन डॉ दिनशॉ परदीवाला त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया करणार आहेत. परदीवाला यांनी 2019 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या खांद्यावर देखील शस्त्रक्रिया केली आहे. यसोबतच त्यांनी जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, सायना नेहवाल यांच्यावरही शस्त्रक्रिया केली आहे.
सरावादरम्यान झाली होती दुखापत
विकासने शस्त्रक्रियेबद्दल पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं की, ”मी तीन महिन्यानंतर पुन्हा पुनरागमन करणार आहे. डॉ परदीवाला यांनी माझा खांदा ‘डिस्लोकेट’ झाला असल्याचं सांगितलं आहे.’’ तसेच ‘मला ही दुखापत ऑलिम्पिक पूर्वी इटलीमध्ये सराव करत असताना झाली होती. मी तेव्हा दुखापतीबद्दल अधिक विचार न करता तसंच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला. पण आता दुखापत वाढल्याने मला शस्त्रक्रिया करावी लागत आहे.’ असंही विकासने सांगितलं.
इतर बातम्या
सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही
(Indian Boxer vikas krishan undergoes shoulder surgery after loosing in tokyo olympic)