Tokyo Olympics 2021: भारतीय महिला हॉकी संघ सेमीफायनलमध्ये, असा असेल पुढचा सामना, वाचा संपूर्ण माहिती
भारतीय महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम खेळ दाखवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाला 1-0 ने नमवल्यानंतर आता भारतीय महिलांसमोर तगडे आव्हान असणार आहे.
Tokyo Olympics 20-2021 : यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी आपला अप्रतिम खेळ दाखवत आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ आतापर्यंत दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. रविवारी पुरुष संघाने ग्रेट ब्रिटनला 3-0 ने नमवत सेमीफायनल गाठली. तर महिला हॉकी संघाने (India’s Women’s Hockey Team) पहिल्यांदाच सेमीफायनलपर्यंत (Semi-Final) धडक घेतली आहे. महिलांनी आतापर्यंत 3 वेळेस ऑलिम्पिक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला 1-0 ने नमवत विजय मिळवला आहे. आता सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय महिलांसमोर अर्जेंटीना संघाचे आव्हान असणार आहे.
महिला हॉकी संघाने 1980 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात केली. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर थेट 36 वर्षांनी 2016 मध्ये भारतीय महिला रियो ऑलिम्पिकमध्ये खेळल्या होत्या. त्याठिकाणी एकही सामना महिलांना जिंकता आला नव्हता. यंदाच्या ऑलिम्पिक मध्ये देखील भारतीय महिलांची सुरुवात परभवांनी झाली. पण ग्रुप स्टेजमधील अखेरचे दोन सामने जिंकत भारतीय महिलांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आता ऑस्ट्रेलियाला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
सेमीफायनलमध्ये अर्जेंटीनाशी सामना
कर्णधार रानी रामपालच्या नेतृत्त्वाखाली क्वॉर्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर आता भारतीय महिलांसमोर अर्जेंटीना संघाचे आव्हान असणार आहे. अर्जेंटीना संघाने क्वॉर्टर फायनलमध्ये जर्मनीला 3-0 ने मात देत सेमीफायनल गाठली आहे. भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील सेमीफायनलचा सामना 4 ऑगस्ट रोजी होईल. भारतासाठी हा सामना तसा अवघड असणार आहे. याचे कारण अर्जेंटीना संघाचा आक्रमक खेळ आणि वर्ल्ड रँकिंगमध्ये असणारी अप्रतिम पोजीशन आहे.
भारतीय महिलांचा आत्मविश्वास वाढला
उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना भारतीय महिलांसाठी कठीण मानला जात होता. दिग्गज आणि तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलिया संघ अधिक बलाढ्य मानला जात होता. याआधी तीन वेळेस ऑलिम्पिक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने यंदाही ग्रुप स्टेजमध्ये केवळ एकच गोल खाल्ला होता. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ग्रुप स्टेजमध्ये 7 गोल खाऊन उपांत्य पूर्व फेरीत पोहोचली होती. पण या सामन्यातील 4 क्वार्टरमध्ये 60 मिनिटांपर्यंत अप्रतिम हॉकीचे दर्शन घडवत भारतीय महिलांनी विजयश्री मिळवला. या विजयामुळे भारतीय महिलांचा आत्मविश्वास वाढला असून याचा फायदा सेमीफायनच्या सामन्यात नक्कीच होईल.
संबंधित बातम्या
Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश
PHOTOS : भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ पाच जणींच्या जोरावर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश
(Indian women hocky team will play semifinal match against argentina)