Tokyo Paralympics 2020: भाविनाने देशासह कुटुंबियांना समर्पित केलं पदक, नातेवाईकांनी गरबा खेळत साजरा केला विजय
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने पदकांचे खाते उघडले आहे. टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलला अंतिम सामन्यात चीनच्या खेळाडूने नमवले असले तरी भारताला रौप्य पदक मात्र मिळाले आहे.
Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने (Bhavina patel) उत्कृष्ट खेळ करत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. अंतिम सामन्यात तिने भारताला रौप्य पदक मिळवून देत आज क्रीडादिनी देशवासियांना जणू एक भेटवस्तूच दिली आहे. तिने हा विजय देशासह कुटुंबियांना समर्पित केला आहे. तर दुसरीकडे तिच्या घरातील सदस्यांना अत्यंत आनंद झाला असल्याने त्यांनी गरबा खेळत भाविनाचा विजय साजरा केला आहे.
रौप्य पदक विजयानंतर भाविना भावूक झालेली पाहायला मिळाली. ती देशातील नागरिकांचे धन्यवाद देत म्हणाली, ”माझे जितकेही चाहते आहेत त्यांना आणि देशातील नागरिकांना मी हे पदक समर्पित करते. त्यांच्या मदतीनेच मी इथवर पोहोचले आहे. मी आज खूप आनंदी असून माझे प्रशिक्षक आणि प्रत्येकवेळी मला प्रेरणा देणारे माझे कुटुंबीय यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छिते.’
कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना
भाविना पटेलने रौप्य पदक जिंकताच तिच्या घरातल्यांनी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब गरबा करुन आनंद व्यक्त करत आहे. तर संपूर्ण परिसरात मिठाई देखील वाटली जात आहे. भाविनाचे कुटुंबिय गरबा खेळत असलेला व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.
#WATCH Family members and friends of Para-paddler Bhavina Patel in Mehsana perform ‘garba’ to celebrate her bringing home a Silver medal in her maiden Paralympic Games pic.twitter.com/h55CAAycOG
— ANI (@ANI) August 29, 2021
सुवर्णपदक हुकले…
स्पर्धेत पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दमदार पुनरागमन करत भाविना एका पाठोपाठ एक असे सर्व सामने जिंकत अंतिम सामन्यात पोहोचली. अंतिम सामन्यात मात्र भाविनाला 3-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले. तिला हा पराभव जागतिक क्रमवारीत नंबर वन चायना पॅडलरकडून स्वीकारावा लागला. तिने भाविनाला कोणत्याही गेममध्ये शेवटपर्यंत वर्चस्व मिळू दिले नाही. चिनी पॅडलरने 7-11, 5-11, 6-11 असा भाविनीचा पराभव केला. दरम्यान अंतिम सामन्यात पराभवामुळे भाविना स्पर्धेत दुसरी आल्याने तिला रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
हे ही वाचा :
(TOkyo paraolympic 2020 bhavina patel Wins Silver medal her family celebrates with dancing on garba)