Vinesh Phogat : निकालाचा दिवस, विनेशला रौप्य पदक मिळणार का? वजन का वाढलं? CAS समोर खुलासा
Vinesh Phogat : विनेश फोगाटच्या प्रकरणाचा आज निकाल लागू शकतो. विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास भारताच्या खात्यात आणखी एक रौप्य पदक जमा होईल. फायनलआधी जास्त वजन झाल्याने विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं होतं. ती 50 किलो वजनी गटात खेळत होती. विनेशने आता या निर्णयाविरोधात CAS कडे दाद मागितली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट महिला कुस्तीत 50 किलो वजनी गटात खेळत होती. क्वार्टर फायनल सामन्यात तिने वर्ल्ड नंबर 1 कुस्तीपटू युई सुसाकीला हरवलं. त्यानंतर सेमीफायनलमध्ये शानदार विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. सामन्याआधी तिच वजन 100 ग्रॅम जास्त भरलं. त्यामुळे फायनलसाठी तिला अपात्र ठरवण्यात आलं. तिला मिळणार मेडलही काढून घेण्यात आलं. त्यानंतर विनेश फोगाटने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये (CAS) याचिका दाखल केली. तिथे सुनावणी दरम्यान विनेशने पॅरिस ऑलिम्पिकची पोलखोल केली. फायनलआधी वजन कमी करण्यात अपयशी का ठरली? त्याचा खुलासा सुद्धा विनेशने केला.
विनेशने CAS समोर पॅरिस ऑलिम्पिकमधील अनेक अनियमिततांचा खुलासा केला. पॅरिस ऑलिम्पिकमधील कमतरता दाखवताना वजन कमी का करता आलं नाही? त्याचा खुलासा केला. विनेशनुसार रेसलिंग वेन्यू आणि एथलीट विलेजमध्ये बरच अंतर होतं. त्याशिवाय सामन्यांच शेड्यूल खूप व्यस्त होतं. त्यामुळे ती आपलं वजन कमी करु शकली नाही.
3 तास सुनावणी
भारतीय ऑलिम्पिक संघ आणि विनेश फोगाटकडून हरिश साळवे यांनी कोर्टात बाजू मांडली. भारतीय कुस्तीपटू विनेशला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कायदेशीर बाजू मांडली. तर्क CAS समोर मांडले. या प्रकरणात 9 ऑगस्टला जवळपास 3 तास सुनावणी झाली. ही सुनावणी एनाबेले बेनेट यांच्यासमोर झाली. त्यांचा निर्णय आज येऊ शकतो. निकाल विनेशच्या बाजूने असेल अशी IOA ला अपेक्षा आहे.
विनेशला मेडल मिळाल्यास पदकांची संख्या किती होणार ?
फायनलआधी जास्त वजन भरल्याने विनेशला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे विनेशच्या जागी गुजमॅन लोपेज फायनलचा सामना खेळली. विनेशने सेमीफायनलमध्ये लोपेजला हरवलं होतं. लोपेज फायनलमध्ये हरली. तिला रौप्य पदक मिळालं. विनेशच्या याचिकेत हे मेडल शेयर करण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. IOA आपल्या बाजूने निर्णय येईल, या प्रतिक्षेत आहे. विनेशला मेडल मिळाल्यास भारताच्या पदकांची संख्या 7 होईल. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला इतकीच पदकं मिळाली होती. यात नीरज चोप्राच एक गोल्ड मेडल होतं.