दिपीकाच्या हातून फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचं अनावरण हा हिंदूविरोधी अजेंडा की बिझनेस फंडा? पाहा Tv9 स्पेशल रिपोर्ट
फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचं अनावरण करणारी दिपीका पदूकोन जगातली पहिली अभिनेत्री ठरलीय.
मुंबई : फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचं अनावरण करणारी दिपीका पदूकोन जगातली पहिली अभिनेत्री ठरलीय. आजवर हा मान बॉलिवूडच नव्हे तर जगातल्या कोणत्याही सिनेसृष्टीतल्या अभिनेत्रीला मिळाला नव्हता. मात्र दिपिका पदूकोनला सातासमुद्रापारहून फिफा विश्वचषकाचं आमंत्रण कसं मिळालं. जगभरातल्या असंख्य अभिनेत्रींऐवजी फिफा वर्ल्डकप आयोजकांनी दिपीकालाच अनावरणाचं आमंत्रण का दिलं? यावरुन सोशल मीडियात दावे रंगलेयत.
एका गटानं दिपीका पदूकोनला कतारचं आमंत्रण येण्यामागे थेट भारतविरोधी शक्तीचा हात असल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकला फिफानं आमंत्रण दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. नेहमी हिंदूंविरोधी गरळ ओकणाऱ्या झाकीर नाईकला ज्या आयोजकांनी निमंत्रण पाठवलं, त्याच आयोजकांनी दिपीका पदूकोनला फुटबॉल ट्रॉफीच्या अनावरणासाठी बोलावल्याचा दावा होतोय.
यानंतर पठाण सिनेमावरुन वाद रंगलेला असताना परकीय शक्ती दिपीकाच्या पाठिशी मु्द्दामहून उभं राहत असल्याचंही काही जण म्हणतायत.
दुसरा गट मात्र हा दावा पूर्ण खोटा ठरवतोय. त्यांच्या मते जगातला सर्वात मोठा ग्राहकवर्ग भारतात आहे. पण तरीही क्रिकेटइतकं प्रेम भारतात फुटबॉलला मिळालेलं नाही. म्हणून भारतातले सेलिब्रिटी घेऊन फुटबॉलला ग्लॅमर मिळावं.
फुटबॉलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणूनच दिपीकाला कतारनं आमंत्रण पाठवलं. त्यासाठीच जियोनं सुद्दा फुटबॉलचा सामना भारतभरात मोफत स्ट्रिमिंग केला.
क्रिकेटचा हात पकडूनच भारतात पेप्सी, कोकोकोला सारख्या कंपन्यांनी जम बसवला. तसाच जम फुटबॉलच्या माध्यमातून इतर कंपन्यांना बसवायचाय, काहींच्या मते जसं ऐश्वर्या रॉय मिस युनिर्व्हस झाल्यानंतर जगभरातल्या कॉस्मेटिक कंपन्यांना भारतात ग्राहक मिळाला, तसाच व्यावसायिक हेतू दिपीकाच्या हस्ते फुटबॉल ट्रॉफी अनावरणाचा आहे.
आता फुटबॉल विश्वचषक आयोजकांनी नेमकं दिपीकालाच का बोलावलं? त्याचं ऑफिशियल कारणंही समजून घ्यायला हवं.
फ्रान्सची लुई विटॉन ही कंपनी फॅशन आणि हाऊस जगतात ख्यातनाम कंपनी आहे. आणि दिपीका याच कंपनीची ब्रॅड अॅम्बेसेडर म्हणून काम करते. पण इतकंच कारण पुरेसं नाहीय. तर फुटबॉल वर्ल्डकपसाठीची जी केस बनवली गेली, ती लुई विटॉन कंपनीनं बनवली होती. त्यामुळे कंपनीची ब्रॅड अँम्बेसेडर म्हणून दिपीकाच्या हातून वर्ल्डकप ट्रॉफीचं अनावरण झालं.
युरोपात इटली आणि फ्रान्स हे देश फॅशन आणि कॉस्मेटिकच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्राहून लहान असलेल्या या दोन्ही देशांमधल्या ब्रॅड्सचा जगभरात बोलबाला आहे. आणि भारत जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
युरोपातले सर्व 48 देश जरी एकत्र केले तरी त्यांची लोकसंख्या फक्त 80 कोटींच्या घरात जाते. आणि एकट्या भारताची लोकसंख्या 140 कोटींहून जास्त आहे.
म्हणून भारतात फुटबॉलचा फार गाजावाजा नसूनही दिपीकाला आमंत्रण का येतं? याचं उत्तर फुटबॉलच्या चाहत्यांऐवजी फुटबॉलच्या निमित्तानं मिळणाऱ्या बाजारपेठेत दडलंय.