पहिला सामना, पहिल्याच चेंडूवर छक्का, Google चे CEO सुंदर पिचाईही वैभव सूर्यवंशीवर फिदा; असं केलं कौतुक
वैभव सूर्यवंशीने 14 वर्ष 23 दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये पदार्पण करून इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या या कामगिरीचे सुंदर पिचाई यांनीही कौतुक केले आहे. वैभवने केवळ पहिल्या चेंडूवरच नव्हे तर संपूर्ण सामन्यातच उत्कृष्ट कामगिरी केली.

वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयात डेब्यू करणारा खिलाडी बनला आहे. वैभव बिहारचा आहे. त्याचं वय 14 वर्ष 23 दिवस आहे. लखनऊच्या सुपर जायंट्सविरोधात राजस्थान रॉयल्ससाठी त्याने आयपीएल डेब्यू केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने पदार्पणातच पहिल्या चेंडूवर छक्का मारला आहे. त्याचा हा दबंग अंदाज पाहून सर्वच थक्क झाले. जणू काही क्रिकेटच्या मैदानात बऱ्याच वर्षानंतर वादळ आलं. एवढेच नव्हे तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाईही वैभवच्या प्रेमात पडले. एवढ्या कमी वयात दिग्गजांसमोर उभं राहून बेधडक षटकार लगावणाऱ्या वैभवचं पिचाई यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.
सुंदर पिचाई काय म्हणाले?
वैभव सूर्यवंशीने सवाई मानसिह स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यामुळे संपूर्ण स्टेडियमने स्टँडिग ओविएशन देत त्याचं कौतुक केलं. टाळ्यांचा अक्षरश: पाऊस पडला. शिट्ट्यांनी संपूर्ण स्टेडियम दणाणून गेलं. त्यानंतरही वैभव भारावून गेला नाही. त्याने मैदानावर आपला जलवा कायम ठेवला. 170च्या स्ट्राईक रेटने त्याने 20 चेंडूत 34 धावा केल्या. यावेळी त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. यावरून त्याची रेंज कळून येते. पहिल्याच सामन्यात अशा पद्धतीने क्वचितच कामगिरी पाहायला मिळते. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील या पोराची ही तुफानी खेळी पाहून सुंदर पिचाईंना वेड लागलं नसतं तर नवलंच. पिचाई यांनी सोशल मीडियावर वैभवचं कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली आहे. 8 वी क्लासच्या या मुलाला आयपीएल खेळताना पाहायला मी उठलो. काय शानदार डेब्यू आहे राव, असं पिचाई यांनी म्हटलंय.
Woke up to watch an 8th grader play in the IPL!!!! What a debut! https://t.co/KMR7TfnVmL
— Sundar Pichai (@sundarpichai) April 19, 2025
1.10 कोटीत खरेदी
राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025मध्ये मेगा ऑक्शनमध्ये 1.10 कोटी रुपयात त्याला खरेदी करण्यात आलं होतं. तेव्हा तो 13 वर्षाचा होता. तसेच आयपीएलमध्ये काँन्ट्रॅक्ट मिळवणारा सर्वात कमी वयाचा तो खेळाडू होता. 19 एप्रिल रोजी राजस्थानने त्याला संघात स्थान दिलं. कर्णधार संजू सॅमसन जखमी झाल्याने त्याला संधी देण्यात आली आहे. त्याचा त्याने भरपूर फायदा उचलला. कालचा त्याचा स्फोटक खेळ पाहून पुढच्या सामन्यातही त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. वैभवने या आधी 2024मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी रणजी करंडकात बिहारसाठी फर्स्ट क्लास डेब्यू केला होता.
पहिल्याच सामन्यात हा विक्रम
वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा तो 10 वा खेळाडू बनला आहे. यापूर्वी 9 खेळाडूंनी हा कारनामा केला आहे. त्यात रॉब क्विनी (राजस्थान रॉयल्स), केवोन कूपर (राजस्थान रॉयल्स), आंद्रे रसेल (कोलकाता नाइट राइडर्स), कार्लोस ब्रेथवेट (दिल्ली कॅपिटल्स), अनिकेत चौधरी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु), जेवन सियरल्स (कोलकाता नाइट राइडर्स), सिद्धेश लाड (मुंबई इंडियंस), महीश तीक्षणा (चेन्नई सुपर किंग्स) आणि समीर रिजवी (चेन्नई सुपर किंग्स) आदींचा समावेश आहे.