World Cup : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांचे दमदार आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला मात्र ही धावसंख्या गाठता आली नाही.
World Cup 2019 | लंडन (इंग्लंड) : विराट कोहलीच्या टीम इंडियाने विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांचे दमदार आव्हान उभे केले होते. मात्र, प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला ही धावसंख्या गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाला भारताने 50 षटकात 316 धावांतच गुंडाळलं. त्यामुळे भारताने या सामन्यात 36 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. धवनच्या 117, कर्णधार विराट कोहलीच्या 82 आणि रोहित शर्माच्या 57 धावांच्या जोरावर, भारताने कांगारुंसमोर 353 धावांचं तकडं आव्हान उभं केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन टीमचा पार धुव्वा उडाला. कांगारुंना भारताने 50 षटकात 316 धावांत गुंडाळलं.
भारताकडून सलामीवीर शिखर धवनने तुफान खेळी केली. त्याने 109 चेंडूंमध्ये 117 धावा केल्या. त्याला रोहित शर्माचीही चांगली साथ मिळाली. रोहितने संयमी खेळी करत 70 चेंडूत 57 धावा केल्या. रोहित बाद झाल्यांतर धवनच्या साथीला कर्णधार कर्णधार विराट कोहली मैदानात आला. या जोडीनेही दमदार भागीदारी रचली. कोहलीने चांगलीच फटकेबाजी केली. अंतिम षटकात धावा ठोकण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. कोहलीने 77 चेंडूत 82 धावा केल्या.
याशिवाय हार्दिक पंड्या 27 चेंडूत 48 आणि महेंद्रसिंह धोनी 14 चेंडूत 27 धावा केल्याने भारताला ऑस्ट्रेलियासमोर मोठी धावसंख्या उभी करता आली.
यानंतर 353 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघानेही संयमी सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवलं. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव या हुकमी गोलंदाजांनी आपली भूमिका योग्यरित्या बजावली. भुवनेश्वर आणि बुमराहने प्रत्येक 3 तर चहलने 2 विकेट घेतल्या.
World Cup : धवनची ‘गब्बर’गिरी, टीम इंडियाकडून अनेक विक्रमांची नोंद
ऑस्ट्रेलियाच्याकडून स्टिव्ह स्मिथने 69, डेविड वॉर्नरने 56 आणि अॅलेक्स कॅरीने नाबाद 55 धावांची खेळी केली. विकेट टिकवण्याचा नादात ऑस्ट्रेलियाला धावफलक आवश्यक त्या वेगाने पुढे नेता आला नाही. तरीही सामन्याच्या मध्यापर्यंत ऑस्ट्रेलियाने आपले आव्हान कायम ठेवले. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नांगी टाकली.
जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. याच्या जोडीला चहलनेही 2 विकेट घेतल्या.