‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’मध्ये पुणेरी उस्तादची ‘मुसंडी’
संदीप जाधव टीव्ही 9 मराठी, पुणे : खेळ म्हटल्यावर एका गोष्टीची अपेक्षा करावी म्हणतात ती म्हणजे अनपेक्षितता. असेच काहीसे रविवारी झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या महाअंतिम सोहळ्यात घडले. शांताराम मनवे व परितोष पेंटर यांच्या पुणेरी उस्ताद संघाने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या विजेतेपदावर नाव कोरले. यानिमित्त त्यांनी यशवंत साताऱ्याची विजयी माला मोडीत […]
संदीप जाधव टीव्ही 9 मराठी, पुणे : खेळ म्हटल्यावर एका गोष्टीची अपेक्षा करावी म्हणतात ती म्हणजे अनपेक्षितता. असेच काहीसे रविवारी झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या महाअंतिम सोहळ्यात घडले. शांताराम मनवे व परितोष पेंटर यांच्या पुणेरी उस्ताद संघाने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या विजेतेपदावर नाव कोरले. यानिमित्त त्यांनी यशवंत साताऱ्याची विजयी माला मोडीत काढली. चमचमते तारे व अनेक मान्यवरांच्याउपस्थितीत झी महाराष्ट्र कुस्ती दंगल कुस्तीचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. कुस्ती दंगलचा हा अंतिम सामना श्री शिव छत्रपती क्रीडापीठ म्हणजेच पुण्याच्या महाळुन्गे-बालेवाडी स्टेडियममध्ये रंगला.
- विजयी पुणेरी उस्तादला ५० लाखांचे इनाम
- उपविजेत्या यशवंत साताराला ३० लाख
- तिसऱ्या विदर्भाचे वाघ संघाला २० लाख
आर्मीमॅन विनोद कुमार ‘मॅन ऑफ द सिरीज’
आजवरचे सर्व सामने जिंकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या यशवंत सातारा हा संघ पहिल्या दिवसापासून आपले वर्चस्व सिद्ध करत आला होता. मात्र महाअंतिम सोहळ्यात पुणेरी उस्तादने त्यांचे हे अढळ स्थान हिसकावण्यात ४-२ ने असे दणदणीत यश मिळवले. काळजाचे ठोके वाढवणारा असा हा अंतिम सामना रंगला. कडवी झुंज देत अखेर झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सामन्यात पुणेरी उस्ताद हा संघ यशवंत ठरला. विशेष म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरीही पुनीय उस्तादचा आर्मीमॅन विनोद कुमार ठरला.
दिग्गजांची उपस्थिती
झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या महाअंतिम सोहळ्याला एस्सेल समूहाचे अध्यक्ष श्री सुभाष चंद्रा आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष श्री शरद पवार, महाराष्ट्र कुस्तीवीर परिषदेचे उपाध्यक्ष काकासाहेब पवार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे अशा मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, नागराज मंजुळे, सोनाली कुलकर्णी, संजय नार्वेकर, मोहसीन अख्तर, हेमंत ढोमे या ग्लॅमरस मांदियाळीने कुस्ती दंगलच्या या महाअंतिम सोहळ्यासाठी आवर्जून हजेरी लावली. इतकेच नाही तर अंतिम सामन्याआधी, गायक आदर्श शिंदे यांचा जबरदस्त परफॉर्मन्स रंगला. तसेच श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम यांच्या कॉमेडी स्किटने तणावपूर्ण वातावरणात हास्याचा तडका लावला.
झी महाराष्ट्र कुस्ती दंगलच्या विजेत्या संघाला ५० लाख, उपविजेत्यांना ३० लाख तर तिसऱ्या संघाला २० लाखांचे इनाम देण्यात आले. तसेच शरद पवार यांनी या मंचावर काही महत्त्वाच्या शिष्यवृत्ती जाहीर केल्या. तसेच ही दंगल दरवर्षी होणार आणि पुढच्या वर्षी अधिक मोठ्या स्तरावर होईल याची याची परिषद काळजी घेईल असे पवार यांनी आश्वासन दिले.
अंतिम फेरीआधी, दुसऱ्या पात्रता फेरीत पुणेरी उस्ताद संघाने बाजी अंतिम फेरीत धडक मारली. विदर्भाचे वाघला ५-१ने हरवून पुणेरी उस्ताद पुन्हा एकदा जोशात साताराविरुद्ध मैदानात उतरले. त्यामुळे पुणेरी उस्तादचा संघ पुनश्च यशवंत सातारासोबत महाअंतिम सामन्यात लढताना दिसला. या पात्रता सामन्यातून, विनोद कुमारला प्लेअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आले. तर महाअंतिम सामन्यात, पुणेरी उस्तादच्या राहुल आवारेला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. दोन्ही सामन्यातील, संग्राम पाटील आणि कौतुक डाफळे यांच्यातील डाव हा फँटास्टिक फाईट ऑफ द डे ठरला. प्रेक्षकांनी कुस्तीच्या या महासंग्रामाची मजा झी टॉकीज, झी मराठी, झी अनमोल आणि झी५ ऍपवर लाइव्ह बघून घेतली.
“कुस्तीगीर परिषदेच्या वतीने झी महाराष्ट्र कुस्ती दंगल हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल व त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल मी लाखलाख आभार मानतो. कुस्तीला मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे होतकरू मल्लांचा या खेळाकडे वळण्याचा उत्साह आणखीन वाढेल अशी आशा आहे. हे उगवते तारे भविष्यात हिंदुस्तानासह जग गाजवतील. त्यामुळे अशा पद्धतीचा पुढाकार घेतल्याबद्दल मी झी टॉकीज, झी समूह आणि सुभाष चंद्रा यांचे अभिनंदन करतो.” – शरद पवार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष
महाअंतिम सामना
पुणेरी उस्ताद (४) विरुद्ध यशवंत सातारा (२)
डाव – ५५ वजनगटातील विश्रांती पाटील विरुद्ध अंशु मलिक यांच्यात एकतर्फी डाव रंगला. अक्षरशः दीड मिनिटाच्या आत यशवंत साताऱ्याच्या अंशुने विश्रांतीला चितपट केले.
डाव – ७४ वजनगटातील विनोद कुमार विरुद्ध अक्षय चोरगे हा खतरनाक डाव होता. आर्मीमॅन विनोदला दुखापत झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. अटीतटीच्या या डावात अखेर, पुणेरी उस्तादच्या विनोदनेच ७-११ने यश मिळवले.
डाव – ६५ वजनगटातील राहुल आवारे विरुद्ध सूरज कोकाटे यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळाली. अत्यंत चुरशीच्या या डावात अखेर पुणेरी उस्तादच्या कॅप्टन राहुलने १६ गुण मिळवत ६-१६ने सुरजला नमवले.
डाव – ८६ वजनगटातील संग्राम पाटील विरुद्ध कौतुक डाफळे या तुफानी लढतीत दोन्ही मल्ल अप्रतिम खेळले. उत्कंठा वाढवणाऱ्या या डावात शेवटी पुणेरी उस्तादच्या संग्रामने १०-९ने महत्त्वाचा विजय मिळवून देत संघाला विजेतेपदाच्या जवळ नेले.
डाव – ८६+ वजनगटातील गणेश जगताप विरुद्ध आदर्श गुंड हा निर्णायक डाव अत्यंत रंजक ठरला. हा डाव म्हणजे महाअंतिम सामन्यातील निर्णायक डाव ठरला. पुणेरी उस्तादच्या गणेशने ७-२ने संघाला चौथा विजय मिळवून देत महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये बाजी मारली.
डाव – ५७ वजनगटातील पंकज पवार विरुद्ध उत्कर्ष काळे हा शेवटचा डाव थरारक ठरला. पंकजला दुखापत झाल्याने यशवंत साताऱ्याच्या उत्कर्षला विजयी घोषित करण्यात आले.
दुसऱ्या पात्रता फेरीचा सामना
पुणेरी उस्ताद (४)विरुद्ध विदर्भाचे वाघ(२)
डाव – ५५ वजनगटातील विश्रांती पाटील विरुद्ध दिशा कारंडे हा शेवटच्या दिवसातील पहिला डाव प्रेक्षणीय ठरला. पुणेरी उस्तादच्या विश्रांतीने ८ गुण मिळवत दिशाला हरवले.
डाव – ७४ वजनगटातील विनोद कुमार विरुद्ध किरण नलावडे ही अफलातून लढत बघायला मिळाली. आर्मीमॅन आणि आतापर्यंत सलग विजय मिळवत आलेल्या पुणेरी उस्तादच्या विनोदने पुन्हा एकदा किरणला आस्मान दाखवण्यात यश मिळवले.
डाव – ६५ वजनगटातील राहुल आवारे विरुद्ध सोनबा गोंगाणे हा चुरशीचा डाव होता. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असा हा डाव असल्याने अत्यंत महत्त्वाचा ठरला. अखेर पुणेरी उस्तादच्या कॅप्टन असल्या राहुलने ११ गुण मिळवत ११-६ने हा डाव खिशात घातला.
डाव – ८६ वजनगटातील संग्राम पाटील विरुद्ध आर्मेनिया देशातील मार्गरेन वॉल्टर हा जबरदस्त डाव रंगला. पुणेरी उस्तादच्या संग्रामने आक्रमक खेळी दाखवत ६-३ने विदर्भाचे वाघमधील आंतरराष्ट्रीय वाघ वॉल्टरला हरवले.
डाव – ५७ वजनगटातील सौरभ पाटील विरुद्ध विजय पाटील ही खेळी उत्कंठावर्धक ठरली. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या या दोन पाटलांच्या लढतीत, शेवटी विदर्भाचे वाघसंघाच्या विजयने ४-६ने विजय मिळवला.
डाव – ८६+ वजनगटातील गणेश जगताप विरुद्ध समीर देसाई या अटीतटीच्या डावावर अंतिम फेरीत कोण जाणार हे ठरणार होते. त्यात गणेश हा विजय चौधरीच्या जागी खेळला तर समीरने विष्णू खोसेची जागा घेतली होती. अशावेळी दोन्ही खेळाडूंवर ताण असतानाही त्यांनी सुंदर कुस्तीचे प्रदर्शन केले. विदर्भाचे वाघमधील गणेशने ६-३ने विजयश्री खेचून आणले.